अनिल बोंडे यांची शरद पवार यांच्यावर खोचक टीका; म्हणाले, आता बोलायला…
![Anil Bonde said that Sharad Pawar had banned the export of onion when he was the agriculture minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Anil-Bonde-and-sharad-pawar-780x470.jpg)
मुंबई : कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के कर लावला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, यावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना कांदा निर्यातीवर बंदी आणली होती. आता विरोधकांना बोलायला नाक उरलं नाही, असं अनिल बोंडे म्हणाले.
अनिल बोंडे म्हणाले, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लादली नाही. त्यानी केवळ ४० टक्के कर लावला आहे. कराचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सरकारने लगेच नाफेडकडून दोन लाख टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचा संकल्प केला आहे. या कांद्याला २४१० रुपयांचा भाव जाहीर केला आहे. शेतकऱ्यांचं कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे.
खरं तर, विरोधकांना बोलण्यासाठी नाक राहील नाही. शरद पवार कृषीमंत्री असताना कांद्याची अशी परिस्थिती उद्भवली होती. तेव्हा त्यांनी अनियंत्रित काळासाठी निर्यात बंदी लागू केली होती. सरकारने आता निर्यात बंदी केलीच नाही, केवळ ४० टक्के कर लावला आहे. हा कर केवळ साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी लावला आहे, असं अनिल बोंडे म्हणाले.
हेही वाचा – Pune : यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुक दुपारी ४ वाजता सहभागी होणार
शरद पवारांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कोणतंही काम केलं नाही, हे शरद पवार विसरून जातात. कापसाची निर्यातही शरद पवारांनी थांबवली होती. कांद्याची निर्यात बंदीही त्यांनी केली होती. मर्यादित काळात व्यापाऱ्यांना फायदा मिळवून दिला होता. शेतकऱ्यांचं नुकसान केलं होतं, हे शरद पवार दुर्दैवाने विसरले आहेत. आता केवळ व्यापाऱ्यांसाठी गळे काढण्याचे काम करत आहेत, असं आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.