‘लोकसभा निवडणुकीपुर्वीच देशात CAA लागू करणार’; गृहमंत्री अमित शाहांची घोषणा
![Amit Shah said that CAA will be implemented in the country before the Lok Sabha elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Amit-Shah-780x470.jpg)
नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याबाबत (CAA) मोठी घोषणा केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा कायदा असून याबाबत अधिसूचना काढली जाणार आहे. निवडणुकीपूर्वीच या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा कायदा असून याबाबत अधिसूचना काढली जाणार आहे. निवडणुकीपूर्वीच या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल. नागरिकत्व सुधारणा कायदा हे काँग्रेसचे वचन होते. देशाची फाळणी झाली तेव्हा देशातील अल्पसंख्याकावर अत्याचार झाले. तेव्हा काँग्रेसने निर्वासितांचे भारतात स्वागत केले आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल असं आश्वासन दिलं होतं. परंतु ते आता मागे हटत आहेत, अशी टीकाही केली.
हेही वाचा – ‘छगन भुजबळ म्हातारे, त्यांना कशाला कोण मारेल’; मनोज जरांगे पाटील
आपल्या देशातील अल्पसंख्याकांना आणि विशेषतः मुस्लिम समुदायातील लोकांना त्यांचं नागरिकत्व काढून घेतलं जाईल, असं भडकवलं जात आहे. परंतु, सीएएमुळे कोणाचंही नागरिकत्व हिसकावून घेतलं जाणार नाही. कारण त्याबाबत तशी तरतूदच करण्यात आलेली नाही. सीएए हा बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आहे, असं अमित शाह म्हणाले.
३१ डिसेंबर २०१४ च्या आधी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देणे या कायद्याचे उद्दीष्ट आहे, असंही अमित शाह म्हणाले.