अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन प्रसिद्धी मिळवणं थांबवा; अमेय खोपकरांनी सुरेश धस यांना सुनावलं
![Amey Khopkar said that Suresh Dhas should apologize to Prajakta Mali.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Amey-Khopkar-and-Suresh-Dhas-780x470.jpg)
मुंबई | बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी याबाबत बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना यांची नावं घेतली. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी पोस्ट करून आमदार धस यांना चांगलच सुनावलं आहे.
अमेय खोपकर काय म्हणाले?
सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत, अशी पोस्ट अमेय खोपकर यांनी एक्सवर केली आहे.
हेही वाचा – ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ३ फरार आरोपींचा मर्डर झालाय’; अंजली दमानिया यांचा मोठा दावा
आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचं असेल, त्यांनी परळीला यावं. शिक्षण घेऊन पूर्ण देशात त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळीसुद्धा आमच्याकडे येतात. जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे, असं सुरेश धस म्हणाले.