breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

अजित पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, केली ‘ही’ मागणी

Ajit Pawar : मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षियांना सोबत घेत राज्य सरकार मोठा कार्यक्रम घेणार असल्याचं अर्थसंकल्पिय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. मात्र तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप कोणतीच कृती राज्य सरकारने केली नसल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिगलं आहे. तातडीने कार्यक्रमाचे आयोजन करा अशी मागणी अजित पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.

अजित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे की, मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष संपायला आलं तरी सरकार हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नाही. मराठवाडा आणि मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षाविषयी सरकारची अनास्था आहे. या कार्यक्रमासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही मंत्रिमंडळ उपसमितीनं अद्याप कार्यक्रम आराखड्यास मंजुरीच दिलेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं राज्यस्तरीय कार्यक्रमांचं तातडीनं आयोजन करण्याबरोबरच या वर्षापासून दरवर्षी मंत्रालय तसंच विधानभवनात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात यावं. येत्या पावसाळी अधिवेशनात मराठवाडा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही सभागृहात दोन दिवस चर्चा करण्यात यावी. यासह दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वामी रामानंद तीर्थ यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

हेही वाचा – करण जोहरचे ७ वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन, नव्या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज!

तत्कालिन महाविकास आघाडीच्या सरकारने मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी दि.४ मे २०२२ रोजी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करुन उपसमितीची कार्यकक्षा ठरविल्या होत्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येतील अशी मी अर्थसंकल्पात घोषणा केली होती. त्यानंतर आपले शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर उपसमितीमध्ये बदल करुन दि.११ नोव्हेंबर २०२२ रोजी नवीन उपसमिती नेमण्यात आली. त्या उपसमितीने वर्षभरात करावयाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून त्याची अंमलबजावणी करावयाचा आराखडा तयार करणे अपेक्षित असताना, तो अद्यापी करण्यात आलेला नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही अद्यापही शासनस्तरावर कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. दि.१७ सप्टेंबर २०२३ पर्यंत हे कार्यक्रम राबविण्याचे प्रयोजन असताना अद्यापही शासनस्तरावर या विषयी उदासिनता दिसून येत आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या कार्यक्रम आराखड्यास अद्याप मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता मिळाली नसल्याचे दिसून येते. एकंदरितच शासन मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यास उदासिन असल्याचे दिसून येते.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या राजधानीत मुंबई, मंत्रालय व विधानभवनात १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे दर वर्षी आयोजन करण्यात यावे. येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा व विधानपरिषद सभागृहामध्ये अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवस मराठवाडा मुक्ती संग्रामावर आधारित चर्चा करण्यात यावी. देशाच्या राजधानीत महाराष्ट्र सदनाच्या आवारात स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा. तसेच शासनाचे मुखपत्र असणाऱ्या ‘लोकराज्य’ मासिकातून मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्ष विशेषांक प्रसिध्द करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या मराठवाड्यातील विविध संघटनांच्यावतीने आलेल्या निवेदनांच्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांना केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button