‘..तरच मी विधानसभेला उभा राहीन’; अजित पवारांचं मोठं विधान
![Ajit Pawar said that I will stand for assembly elections only if you elect our candidate to the Lok Sabha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Ajit-Pawar--780x470.jpg)
पुणे | आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही ज्या उमेदवाराला उभा करू त्याला तुम्ही खासदार केलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही लोकसभेला आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तरच मी विधानसभा निवडणुकीला उभा राहीन, अन्यथा मी निवडणूक लढवणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजितदादांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार म्हणाले की, बारामतीत उद्या आम्ही ज्या उमेदवाराला उभा करू त्याला तुम्ही विजयी केलं पाहिजे. तरच मी पुढे विधानसभा निवडणुकीला उभा राहीन. मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतोय. नाहीतर खुशाल मी माझा प्रपंच बघेन. तुम्ही मला साथच देणार नसाल तर मला माझा प्रपंच पडलाय. मला माझे धंदे पडलेत. मी कशाला हे सगळं करू? यावेळी अजित पवार समर्थकांनी त्यांच्या नावाने घोषणा दिल्या. त्यावर अजित पवार म्हणाले, या घोषणा, तुमची मतं त्या इलेक्ट्रिक (ईव्हीएम) मशीनमध्ये दिसू द्या.
हेही वाचा – श्रीकांत शिंदेंचं भाषण ऐकताना वडील एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात अश्रू
उद्या निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगवेगळे मान्यवर इथे येतील. तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला भावनिक व्हायचं आहे की तालुक्याच्या चाललेल्या विकासाची गती अशीच चालू ठेवायची आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. भावनिक व्हायचं की पुढच्या पिढीची भलं करायचं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. नाहीतर माझ्यासाठी सगळं बस झालं. तुम्ही मला बस झालं म्हणालात तर आपलं काही म्हणणं नाही. त्यानंतर तुम्ही कितीही सांगितलं तरी मी अतिशय हट्टी माणूस आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी माझ्या पद्धतीने पुढच्या गोष्टी करणार, असं अजित पवार म्हणाले.
आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहा, जोमाने प्रचार करा. आमच्या घरात शरद पवार हे एकमेव वरिष्ठ नेते आहेत. बाकीचेही आहेत पण ते पुण्यात असतात. माझं कुटुंब सोडलं तर कदाचित बाकीचे सर्वच जण माझ्याविरोधात प्रचार करतील. कुटुंबातील सर्वजण माझ्या विरोधात गेले तरी ही सर्व जनता माझ्यासोबत आहे. प्रत्येकाला प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु, मला एकटं पाडण्यासाठी काहीजण जीवाचं रान करतील ते बघा, असंही अजित पवार म्हणाले.