तांबे ऐनवेळी वेगळा डाव टाकणार याची कल्पना मी थोरातांना दिली होती; अजित पवारांचा खळबळजनक दावा
![Ajit Pawar said that I had given the idea to Thorat that Tambe would throw a different innings at the right time](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/ajit-pawar-and-balasaheb-thorat-780x470.jpg)
बाळासाहेब थोरात यांना याबाबत काही कल्पना नव्हती का?
पुणे : काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणी अपक्ष अर्ज दाखल केल्याने काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसची ताकद असूनही रिंगणात मात्र काँग्रेसचा उमेदवार नसल्याची नामुष्की निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
सत्यजीत तांबे ऐनवेळी वेगळा डाव टाकणार याची कल्पना मी बाळासाहेब थोरात यांना दिली होती. पण त्यांनी दुर्लक्ष केले, असा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणी अपक्ष अर्ज दाखल केल्याने काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली होती. त्यामुळे नाशिकमध्ये संघटनेची ताकद असूनही रिंगणात काँग्रेसचा उमदेवार नसल्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे. यावर सत्यजीत तांबे यांचे मामा असलेले बाळासाहेब थोरात यांना याबाबत काही कल्पना नव्हती का, असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
दोन-तीन दिवस कानावर वेगळं येत होतं. तेव्हा मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो. त्यांना सांगितले की, असं काहीतरी कानावर येतंय, तुम्ही काळजी घ्या. तुम्ही बघा काही वेगळं शिजतय का? हे मी सत्यजित तांबेंनी उमेदवारी अर्ज भरायच्या आधी संगितलं होतं. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू, उद्या डॉ. सुधीर तांबे यांचाच फॉर्म येईल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसला दिलेल्या धक्क्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता ते काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.