‘निम्मे पिंपरी-चिंचवडकर झोपले असताना मी पुन्हा आलो..’; अजित पवारांची तुफान फटकेबाजी
![Ajit Pawar said that I came again when half of Pimpri-Chinchwadkar was sleeping](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/ajit-pawar-5-780x470.jpg)
पिंपरी : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात आले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली.
अजित पवार म्हणाले, महापालिकेतील विविध कामांत भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले. त्याच्या खोलात जाणार आहे. चुकीचे काम झाल्यास कारवाई केली जाईल. आता मी पुन्हा सरकारमध्ये आलो आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी झपाटून काम करणार आहे. मी आल्यावर गर्दी होते, सुरक्षेसाठी रस्ते बंद ठेवावे लागतात. त्यामुळे निम्याच्यावर पिंपरी-चिंचवडकर झोपले असतानाच शहरात येऊन विकास कामांची पाहणी करणार आहे.
हेही वाचा – सूर्यमालेतील ‘या’ ग्रहावर आहेत एलियन्स! नासाच्या शास्त्रज्ञाने केला जाहीर खुलासा
बारामतीप्रमाणेच पिंपरी-चिंचवडवर माझे लक्ष आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वर्तुळाकार मार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात होईल. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्यावर भर राहील. पुणे-नाशिक रेल्वेचे काम गतीने सुरू आहे. शाहू-फुले-आंबेडकर ही विचारधारा मी सोडलेली नाही. ही विचारधारा आणि वारकरी संप्रदायाचा विचार सर्वांना पुढे घेऊन जाईल. सर्वधर्मसमभाव ही भूमिका आहे, असं अजित पवार म्हणाले.
सर्वांना सुरक्षित वाटले पाहिजे असे काम आम्ही करणार आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष शिवसेनेसोबत जातील, असे कोणाला वाटले होते का? पण गेलोत. मी मंत्रालयात बसून काम करत होतो. राजकीय स्थित्यंतरे घडली. आम्ही सर्वांनी मिळून सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काहींना वेगळे वाटले. पण, हरकत नाही, असंही अजित पवार म्हणाले.