राज्यातील सत्तासंघर्ष निकालापूर्वी अजित पवारांचं सूचक विधान; म्हणाले,..
![Ajit Pawar said that as long as he has the support of 145 MLAs, there is no threat to the government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल आज लागणार आहे. संपुर्ण देशाचं या निकालाकडे लक्ष लागले आहे. यासंदर्भात न्यायालक नेमका कोणाच्या बाजुने निकेल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक सूचक विधान केलं आहे.
अजित पवार म्हणाले की, ज्या दिवसापासून केस दाखल केली, तेव्हापासून चर्चा चालू आहे. ही गोष्ट जूनमध्ये घडली. आज जवळपास मे महिना आहे. बहुतेकजण म्हणत होते की मे महिन्यात सुटया लागतात. त्याआधी याबद्दलचा निकाल लागेल. त्यानुसार आता निकाल येतोय.
हेही वाचा – ब्रिजभूषण शरण सिंह यांची नर्को टेस्ट करावी; कुस्तीपटूंनी केली मागणी
निकाल काहीही लागला तरी माझं स्वत:च मत आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालय हेच सर्वोच्च आहे. त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. घटनेनं त्यांना तो दिला आहे. त्यामुळे ते विचार करतीलच. पण कदाचित हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मला स्वत:ला वाटतं. मी काही मोठ्या वकिलांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं आलं की यासंदर्भात बहुतेक विधिमंडळातली ही बाब आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडूनच त्यांनी माहिती घेऊन निकाल द्यावा अशी शक्यता नाकारता येत नाही, असं अजित पवार म्हणाले.
आत्याबाईला मिशा असत्या तर काय म्हटलं असतं अशा चर्चांना काय अर्थ आहे? आजच्या घडीला त्यांच्याकडे १४५ पेक्षा जास्त बहुमत आहे. त्यामुळे ते सरकार चालवतायत. खूप जणांनी अशी वक्तव्यं केली आहेत की घटनाबाह्य सरकार वगैरे. जरी म्हणायला तसं असलं, तरी त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. सरकार ते चालवत आहेत. निर्णय ते घेत आहेत. बहुमताने लोकशाहीत जो अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाला असतो त्या अधिकारांचा ते पुरेपूर वापर करत आहेत. १४५ आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही, असंही अजित पवार म्हणाले.