नाशिक कुंभमेळ्यासाठी एआय सुरक्षा; ४०११ सीसीटीव्ही व १८ ड्रोन तैनात

नाशिक | सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांच्या गर्दीतील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ४०११ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि १८ टेहळणी ड्रोनचे विशाल नेटवर्क तयार करण्यात येत आहे. या नव्या प्रारूपाद्वारे चित्रीकरणाचे ‘रिअल-टाइम’ विश्लेषण करून महत्त्वाच्या घटनांची ओळख पटवली जाईल, जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीने माणसांची हालचाल, गर्दीचे व्यवस्थापन, संशयास्पद घटना आणि वाहतूक नियंत्रण आदी बाबी साध्य केल्या जाणार आहेत.
प्रयागराजनंतर होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्यात सहा ते सात कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सोहळा गोदावरी काठावर अतिशय दाट वस्तीच्या भागात होतो. त्यामुळे कुंभमेळ्यात गर्दीचे व्यवस्थापन हे यंत्रणांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. २००३-०४ मधील कुंभमेळ्यात नाशिकमध्ये शाही मिरवणुकीवेळी चेंगराचेंगरी होऊन ३० भाविकांना प्राण गमवावे लागले होते. २०१५ मधील कुंभमेळ्यात दक्षता घेतल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. आगामी कुंभमेळ्यासाठी आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनच्या मदतीने अनोखे प्रारूप कार्यान्वित होणार आहे. एकूण ४०११ कॅमेऱ्यांपैकी तीन हजार कॅमेरे नाशिक शहरात तर ७०० कॅमेरे त्र्यंबकेश्वरमध्ये बसविले जातील. उर्वरित कॅमेरे वाहनतळ आणि गर्दी होऊ शकणाऱ्या अन्य ठिकाणी कार्यान्वित होणार आहेत. या प्रणालीचे नुकतेच त्र्यंबकेश्वर येथे प्रात्यक्षिक पार पडले. या माध्यमातून प्रणालीची कार्यक्षमता, विश्लेषणातील अचूकता, प्रतिसाद वेळ आणि एकात्मिक समन्वय क्षमता तपासण्यात आली.
हेही वाचा : सर्वांगीण विकास हीच यशाची गुरुकिल्ली : प्राचार्या डॉ. पी. मालती
त्र्यंबकेश्वर येथील मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार, उत्तर व गायत्री दरवाजा, पोलीस ठाण्याचा परिसर तसेच मुख्य रस्त्यावर विविध प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गर्दीवर देखरेख व व्यवस्थापन करण्यात आले. प्रणालीने भाविकांची उच्च घनता ओळखून सतर्कतेचे संदेश दिले. यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन रांगेच्या व्यवस्थापनाचाही समावेश होता. या प्रणालीची चेहरा ओळखणे, अनधिकृत प्रवेश, आग व धूर शोधणे आणि अनुचित प्रकार शोधणे आदी क्षमता आहे. चाचणीवेळी प्रणालीने अशा घटना निदर्शनास आणून दिल्या. ड्रोन टेहळणीतून रिअल-टाइम माहितीचे विश्लेषण करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरा व ड्रोनद्वारे मिळणारी माहिती ‘कमांड अँड कंट्रोल’ केंद्राला प्राप्त होते. त्या आधारे विभागनिहार कार्यान्वित होणाऱ्या सार्वजनिक संदेश प्रणालीचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
३०० कोटींचा प्रकल्प
कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापन व सुरक्षितता जपण्यासाठी या प्रकल्पावर सुमारे ३०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामध्ये सर्व सीसीटीव्ही ‘कमांड अँड कंट्रोल’ केंद्राशी संलग्न करणे, ड्रोनकडून प्राप्त होणारे चित्रीकरण संकलित करणे आणि आधुनिक डेटा सेंटरची स्थापना करणे आदींचा समावेश आहे.
नाशिक शहर व त्र्यंबकेश्वरमध्ये ४०११ सीसीटीव्हीचे जाळे उभारले जात असून या प्रणालीत ड्रोनचाही समावेश आहे. सर्व कॅमेरे बसविण्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुढील काळात ड्रोन देखरेख, माहितीचे विश्लेषण आणि मध्यवर्ती कमांड सेंटरशी संलग्न करून एकात्मिक प्रणाली कार्यान्वित करण्याचे टप्पे पार पडतील. कुंभमेळ्यात गर्दीचे नियंत्रण करण्यास ही प्रगत प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
– शेखर सिंग (आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण)
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




