नोकर भरतीची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवावी : महापौर माई ढोरे
पिंपरी । प्रतिनिधी
“कोरोनामुळे मागील २ वर्षात राज्य व केंद्र शासनामार्फत नोकर भरतीसाठी नवीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात न आल्याने खुल्या गटासह इतर प्रवर्गातील उमेदवारांनी आपली वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा उमेदवारांना वयोमर्यादेत २ वर्षांची सवलत म्हणजेच वयोमर्यादा २ वर्षांनी वाढवावी तसेच विविध पदांसाठी लवकरात लवकर नोकरभरती घेण्यात यावी”, असे महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या.
हे उमेदवार मागील अनेक वर्षांपासून सरकारी नोकरीसाठी अभ्यास करीत आहे. मागील २ वर्षात जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली असल्याने काहीही चूक नसताना त्यांची परिक्षा देण्याची संधी हिरावून घेतली जात आहे.
“देशातील इतर राज्यांनी देखील उमेदवारांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांना वाढीव संधी उपलब्ध करून दिली आहे. या सर्व गोष्टींचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या भवितव्यासाठी स्पर्धा परिक्षांची वयोमर्यादा २ वर्षांनी वाढवून त्यांना अधिक संधी उपलब्ध करुन देण्यात यावी”, असेही महापौर माई ढोरे म्हणाल्या.