तब्बल 18 वर्षांनी राज ठाकरेंची पावलं ‘मातोश्री’कडे, उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीवर चर्चा सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे हे शिवतीर्थ या निवासस्थानावरुन मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष या भेटीकडे लागले आहे.
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र, आदिती तटकरेंची माहिती
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. मातोश्रीबाहेर फुलांनी सजावट करण्यात आली असून ठिकठिकाणी बॅनरबाजीही पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक हे मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी सध्या अनेक शिवसैनिकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




