‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रभाकर मोरेंचा राजकारणात प्रवेश, अजितदादांनी लगेच सोपवली राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी
![Actor Prabhakar More of 'Maharashtra's Laughter' fame entered politics, Ajit Dada immediately entrusted him with a big responsibility in NCP.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Ajit-Pawar-Prabhakar-More.jpg)
मुंबईः मराठी मनोरंजनसृष्टीतून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेता प्रभाकर मोरे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. प्रभाकर मोरेंनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा हात पकडत पक्षात प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थित मोरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रभाकर मोरे यांना कोकण विभागाची अध्यक्षपदाची जबाबदारी दिला आहे. तसंच चित्रपट सांस्कृतीक विभागाची जबाबदारी दिली आहे, अशी घोषणा खुद्द अजित पवारांनी केली.
यावेळी बोलताना प्रभाकर मोरेंनी म्हटलं, ‘कलाकारांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि कोकणातील कला संस्कृतीत काही अडचणी आहेत. त्यामध्ये मदत करण्यासाठी. व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी म्हणुन हा प्रवेश केला अजित पवार , सुप्रिया सुळे यांचा कलाकारांवर हात आहे. मी सर्वसामान्य कलाकारांसाठी काही तरी करण्याची इच्छा आहे. मला चांगले काम करायचे आहे अजित पवार यांच्या स्वभावामुळे मी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत आहे. रमीची जाहीरात मी करणार नाही इतरांनाही सुद्धा अशा जाहिराती करू नये असं माझं सांगणे आहे.
प्रभाकर मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांना खळखळून हसवत असले. तरी याआधी त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक विनोदी अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. त्यांचे हावभाव, सहजसाधा विनोद प्रेक्षकांना पोटधरुन हसायला भाग पाडतो. अभिनय क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या प्रभाकर यांचा राजकारणातील प्रवेश कितपत यशस्वी ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
प्रभाकर मोरे यांनी टकाटक, कट्टी-भट्टी, पांघरूण, भाई व्यक्ती की वल्ली, कुटुंब, बाई गो बाई अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा विनोदी अंदाज सर्वांनाच भावतो. सोबतच त्यांनी छोट्या पडद्यावरदेखील काम केलं आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे.