भाषण सुरू असताना कार्यकर्त्याने दिली चिठ्ठी, अजित पवारांच्या उत्तरानंतर सभेत एकच हशा

Ajit Pawar Speech : महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळींचे विविध शहरात सभा आणि मेळावे घेत आहेत.
अजित पवार हे देखील ठिकठिकाणी सभा घेत आहेत. एका सभेत अजित पवार यांचं भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्याने त्यांना चिठ्ठी आणून दिली. ती चिठ्ठी वाचून त्यावर अजित पवारांनी दिलेलं उत्तर ऐकून सभेत एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
“पुणे जिल्ह्यातील काही मुले मी नासामध्ये पाठवली. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गोरगरिबांची मुले नासाला गेले आहेत. ही मुले कधी नासाला जाऊ शकले नसते. मात्र, मी त्यांना पाठवल्यामुळे त्या मुलांचे आई-वडील खूप खुश झाले”, असं अजित पवार सभेत बोलत होते. मात्र, एवढ्यात एका कार्यकर्त्याने व्यासपीठावर येऊन अजित पवार यांना एक चिठ्ठी दिली.
‘गावातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा’, अशी मागणी त्या चिठ्ठीच्या माध्यमातून करण्यात आली होती हे अजित पवार यांनी सभेत वाचून दाखवलं. त्यानंतर अजित पवार म्हणाले, “मी एवढं सगळं सांगितलं आणि आता हे, मग राग येणार नाही तर काय? आता मी या ठिकाणी नासाबाबत सांगतो होतो, तर मध्येच मोकाट जणावरांचं, त्या कार्यकर्त्यांचा सत्कार करायला पाहिजे”, असं अजित पवार यांनी म्हणताच सभेत एकच हशा पिकला.
हेही वाचा – निवडणुकीआधीच निकाल आला, भाजपचे 8 उमेदवार विजयी, जल्लोषाला सुरुवात
“सर्वसामान्य समाज माझ्याबरोबर आहे आणि राहणारच आहे, कारण मी सर्वसामान्य समाजाबरोबर आहे. मात्र, कोणीही स्वत:ला उघड पाडू नका. मला हे सगळ्या भागांना सांगायचं आहे”, असं अजित पवार एका कार्यक्रमात भाषण करताना बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी ‘योगेश आलाय का?, स्वप्निल आलाय का?’ असं व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांना विचारलं. मात्र, ते उपस्थित नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगताच अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला.
अजित पवार म्हणाले, “का? त्याचं डायरेक्टर पद झालं, आईला नगरसेवकपद झालं म्हणजे काम संपलं का? आई उपस्थित असल्या तरी स्वप्निल का उपस्थित नाही? तो कुठे गेला? तिकीट मागताना कसे येता? तिकीट द्या, तिकीट द्या, तिकीट द्या. मी कोणाला तिकीटं दिले तर मी त्यांचे कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं पाहाणार का? उद्या सकाळी मला भेट म्हणावं त्याला. योगेश पण आणि स्वप्निलला पण मला भेटायला सांगा. हे असं चालणार नाही. आम्ही रक्ताचं पाणी करतो”, असं म्हणत अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं.




