राज ठाकरेंवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल
![Raj Thackeray, in the case of hurting religious sentiments, filed a complaint with the police.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/raj-thakre-780x470.png)
मुंबईः
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा काल गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई येथे शिवाजी पार्क मैदानावर मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी मनसैनिकांना संबोधित केलं. या सभेत राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात प्रामुख्याने मशिदीवरील भोंगे आणि माहीम येथील अनधिकृत मजार यावर त्यांचा रोख होता. या सभेनंतर आता राज ठाकरेंवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या विरोधात आता कारवाईची मागणी करण्यात येत आहे. गुढीपाडवा निमित्त आयोजित पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याची भावना दुखावल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या विरोधात पिंपरी शहरातील वाकड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वाजीद राजाक सय्यद नावाच्या एका व्यक्तिने राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात येत आहे. त्यांच्या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची संभावना आहे, यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार दाखल करण्यात येत आहे.
“गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेली गोष्ट मला महाराष्ट्र सरकारला सांगायची आणि दाखवायची आहे. मी मध्यंतरी असाच या भागात गेलो होतो. समोर पाहिलं तर मला समुद्रात लोकं दिसली. काय ते समजेना. मी एकाला सांगितलं की बघ रे काय ते. मग त्या माणसाने ड्रोन शूट करुन माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या.”
“प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यावर काय घडू शकतं, या गोष्टीचे गैरफायदे कशाप्रकारे घेतले जातात, तुमचं लक्ष असलं पाहिजे कोणत्या गोष्टी होतायत, जो घटना मानणारा मुसलमान यांना विचारणार आहे जे मी दाखवणार आहे ते तुम्हाला मान्य आहे का. मी हे दाखवण्याआधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, मुंबई मनपाचे आयुक्त, मुंबई पोलीस खात्याचे कमिश्नर विवेक फणसाळकर माझी सगळ्यांना विनंती आहे की, यावर जर समजा तुमची कारवाई होणार नसेल त्यानंतर महिनाभरानंतर काय होईल ते पाहिल्यावर मी सांगेल,” असा इशाराच राज ठाकरेंनी दिला होता.