राहुल कलाटेंविरोधात गुन्हा दाखल, वंचितच्या उमेदवाराला धमकवल्याचा आरोप

पिंपरी | चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना थेरगाव येथील निवडणूक निर्णय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरावा लागतो. काल उमेदवारी अर्ज भरण्यासाचा शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी निवडणूक निर्णय कार्यालयात गर्दी केली होती. याच दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या जावेश रशीद शेख यांनी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.29) दुपारी जावेद शेख हे वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. तेव्हा, राहुल कलाटे यांनी जावेद शेख यांना तू कशाला फॉर्म भरतो आहेस?, तू फॉर्म भरलास तर मी तुला पाहून घेईल तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरी मधून फेकून दिल्याची तक्रार काळेवाडी पोलीस ठाण्यात शेख यांनी दिली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – २८८ मतदारसंघांसाठी ७,९९५ उमेदवारी अर्ज; मविआचे २८१ तर महायुतीचे २८५ उमेदवार
दरम्यान, यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या बाजूला थांबला म्हणून त्याला दुसरीकडे जाऊन थांबण्यास सांगितलं होतं. पोलिसांनी सीसीटीव्ही तापासाव. मी त्यांना धमकी दिली नाही.