महाराष्ट्रात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार, निवडणूक आयोगाची माहिती

Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यातील २८८ जागांसाठी मतदान होणार नाही. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने अद्ययावत मतदार यादी जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यात ९ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त अधिकृत मतदार आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. त्यापैकी ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, तर ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. याशिवाय ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत. महाराष्ट्रात १८ ते १९ वर्ष वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ४०७ मतदार आहेत. याचा अर्थ जवळपास २२ लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत.
हेही वाचा – शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत यांचा ‘आरोप’ निवडणूक विभागाने फेटाळला!
राज्यात सर्वाधिक मतदार ३० ते ३९ वर्ष वयोगटातील आहेत. त्यांची संख्या २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ इतकी आहे. याशिवाय ८५ ते १५० वर्ष वयोगटातील १२ लाख ४० हजार ९१९ मतदार आहेत. यापैकी १२० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ११० मतदार आहेत. ज्यात ५६ पुरुष, तर ५४ महिला आहेत.