२८८ मतदारसंघांसाठी ७,९९५ उमेदवारी अर्ज; मविआचे २८१ तर महायुतीचे २८५ उमेदवार
![7,995 nominations for 288 constituencies; 281 candidates of Mavia and 285 candidates of Mahayuti](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Maharashtra-Assembly-Election-2024-2-780x470.jpg)
Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (२९ ऑक्टोंबर) शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी व महायुतीकडून मंगळवारी दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच होतं. दरम्यान, महायुतीने २८५ तर महाविकास आघाडीने २८१ जणांना उमेदवारी दिली आहे. यासह मनसे, वंचित बहुज आघाडी, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीसह इतर अनेक पक्षांनी राज्यात त्यांचे उमेदवार उभे केले आहेत.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ७,९९५ जणांनी १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक अधिकारी आज (३० ऑक्टोबर) या अर्जांची पडताळणी करतील. तर, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
हेही वाचा – अजित पवारांनी सिंचन घोटाळा चौकशीचं खापर आर.आर. आबांवर फोडले; म्हणाले..
महायुतीच्या जागावाटपात भारतीय जनता पार्टीने १५२ जागा मिळवल्या आहेत. त्यापैकी १४८ जागांवर त्यांनी स्वतःचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर, त्यांनी चार जागा त्यांच्या मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ८० जागा मिळाल्या असून त्यांनी दोन जागा मित्रपक्षांना दिल्या आहेत. अजित पवारांना वाटाघाटीत केवळ ५३ जागा मिळाल्या असून त्यांनी या सर्व जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीने एकूण २८३ जागांवर २८८ उमेदवार दिले आहेत.
मविआच्या जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. कारण त्यांनी राज्यात तब्बल १०४ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने ८७ उमेदवार दिले आहेत. मविआने राज्यातील एकूण २७७ जागांवर २८२ उमेदवार दिले आहेत.