भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील
![mahaenews](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/bjp-logo-Frame-copy.jpg)
मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष पद कोणाकडे सोपवणार यावर गेले अनेक दिवस चर्चा सुरु होती. याच चर्चेवर आता पडदा पडला आहे. कारण कोणतेही बदल न करता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चंद्रकांत पाटील यांनाच पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त केलं आहे.
मागिल वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजेच जुलै महिन्यात चंद्रकांत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने चंद्रकांत पाटलांचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार का? अशी चर्चा सुरु होती. मात्र, भाजपने पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांची निवड करुन त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवला आहे.
दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा मंगल प्रभात लोढा यांचीच निवड केली आहे. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र भाजपमध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. याबाबत भाजपने एक अधिकृत पत्रक काढून माहिती दिली आहे. मात्र, ही निवड किती काळापर्यंत असणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.