पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात आज मनसेचा मुंबईत मोर्चा…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-53.png)
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात आज मनसेचा मुंबईत मोर्चा निघाला. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघाला आहे. यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी धडकणार आहेत. राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक मोर्चासाठी येण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर तयारी सुरु असून नाशिकमधून 10 हजार झेंडे मुंबईकडे रवाना केले आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/mns-flag.jpg)
गिरगाव चौपाटीजवळील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर हा मोर्चा असणार आहे. मात्र, या मोर्चासाठी मुंबईमधील काही मार्ग बंद केले आहेत. तर काही मार्गात बदल करण्यात आले आहेत. याचबरोबर, मोर्चात अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/9038356a-3fbc-45db-a90d-f613f740b306_202002367948.jpg)
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्धचा मोर्चा अभूतपूर्व करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मुंबईतल्या नाक्यानाक्यांवर मनसेचे बॅनर लागले आहेत. रस्ते आणि उड्डाणपूल मनसेच्या झेंड्यांनी भगवे झाले आहेत.
मोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रकं वाटली आहेत. लोकांना मोर्च्यात सामील होण्याचं आवाहन केलं जातं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्य़ेक चौकात बूथ तयार केले आहेत. मोर्चा कसा निघणार याची माहितीही त्यांनी अनेक लोकांना दिली…फिरत्या गाड्यांमधूनही लोकांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं गेलं…
मनसेच्या मोर्च्यासाठी भगव्या आणि काळ्या रंगाचे टी शर्ट छापण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांसाठी कुर्तेही तयार करण्यात आले आहेत. रिस्ट बँडही तयार करण्यात आले आहेत. उद्याच्या मोर्च्यात मनसैनिकांनी गांधी टोपीही परिधान केलेली पहायला मिळतेय… भगव्या रंगातल्या या टोपीवर राजमुद्रा आणि मनसेची निशाणी छापण्यात आली आहे.
दरम्यान आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केलाय. प्रकाश महाजनांनीही मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. राज ठाकरेंनी याआधीही रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढला होता. पण यावेळचा मोर्चा हा सुनियोजित आहे. पक्षाच्या बदलेल्या धोरणाची किनार या मोर्चाला आहे. त्यामुळं हा मोर्चा अभूतपूर्व करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसलेली पहायला मिळतेय….