नरेंद्र मेहतांकडून माझ्या जीवास धोका; भाजपाच्याच नगरसेविकेने केले गंभीर आरोप
मीरारोड | महाईन्यूज
मीरा भाईंदर भाजपाचे सर्वेसर्वा व माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधात भाजपाच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांना तक्रार केली आहे. मेहतांकडून गेल्या काही वर्षांपासून अत्याचार होतअसून मला व कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे सोन्स यांनी म्हटलेले आहे. या तक्रारीमुळे खळबळ उडालेली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी एकीकडे भाजपा व महाविकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस असताना सोमवारी सायंकाळी मेहता यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट टाकून आपण भाजपा तसेच राजकारणाला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. माझ्या कृती, पध्दती वा माझ्या आचरणामुळे भाजपाचे नुकसान होत आहे. माझ्यामुळे पक्षाच्या नेत्यांना लाज वाटेल, मानखाली घालावी लागेल असे काही मी सहन करु शकत नाही असे मेहतांनी सांगितल्याने त्यांना देखील पुढच्या घटनाक्रमाचा अंदाज आला असल्याची शक्यता आहे.