उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी बांधलं शिवबंधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/unnamed-67.jpg)
महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तसेच उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. शिवसेनेकडून याबाबत अधिकृत ट्वीट करत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, गडाख यांना शिवसेनेत आणण्यात मिलिंद नार्वेकर यांची मुख्य भूमिका राहीली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Uddhav-Thackeray-Shankarrao-Gadakh.jpg)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये अहमदनगरमधील नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार असलेले शंकरराव गडाख हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रावादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर क्रांतिकारी शेतकरी पार्टीचे उमेदवार शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील? याकडे सर्वांचे संपूर्ण नेवासा तालुक्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी 28 ऑक्टोबर रोजी माजी खासदार यशवंतराव गडाख आणि आमदार शंकरराव गडाख यांची सोनई येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर शंकरराव गडाख यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंब्याचे पत्र दिले होते.