उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डिलीट केलं ‘ते’ ट्वीट; म्हणाले, कधी कधी वरिष्ठांचं पण ऐकावं लागतं
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पहाटे सहा वाजता पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहाणी केली आहे. कामांची पाहाणी करताना मेट्रोचं काम वेळेत पूर्ण करा, अशा सूचना देखील त्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. त्यानंतर अजित पवार यांनी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती जागवणारे ट्वीट केलेलं होते.
मात्र, काही वेळातच अजित पवार यांनी संबंधित ट्वीट डिलीट केलं आहे. यावरून राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त अजित पवार यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, असं ट्वीट केलेलं होतं. अजित पवारांचा ट्वीट पाहून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, अजित पवार यांनी तासाभरातच हे ट्वीट डिलीट केलं आहे. ट्वीट डिलीट केल्यानं आणखी जोरदार चर्चा रंगली. मात्र, आपण ट्वीट डिलीट का केलं याचं स्पष्टीकरण देखील अजित पवार यांनी दिलं आहे.
समाजकारण, राजकारण करत असताना कधी कधी वरिष्ठांचं पण ऐकावं लागतं, असं अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं आहे. ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबाबत आपण चांगलं बोलतो ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलेलं होतं, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलेलं आहे.