उद्या ED मलाही नोटीस पाठवेल; रोहित पवारांचे भाजपवर टीकास्त्र
मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची आज पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसीमधील भाजी मार्केटला भेट दिलेली आहे. यावेळी रोहित पवार यांनी माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये येणाऱ्या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. याशिवाय केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादलेला आहे.
मात्र, राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, अशी ग्वाहीदेखील रोहित पवार यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, यावेळी पत्रकारांनी राज्यातील नेत्याच्या ईडी चौकशीसंदर्भात प्रश्न विचारलेला असता रोहित पवार म्हणाले की, आतापर्यंत ईडीच्या नोटीसा भाजपाच्या लोकांना नाही, तर फक्त विरोधकांना आल्या आहेत. यावरून आपण भाजपचा कारभार समजून घेऊ शकतो. उद्या मलादेखील ईडीची नोटीस येऊ शकते, अशी खोचक टीकादेखील रोहित पवार यांनी यावेळी भाजपवर केली आहे.
भाजपकडून ईडीचा वापर केवळ राजकीय हेतुने केला जात आहे. गेल्या पाच वर्षात याचा अनुभव सर्वांना आला आहे, असंही रोहित पवार यावेळी म्हणालेले आहेत. येत्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलेलं की, भाजपाच्या विचारधारेला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढेल. महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी समीरकरण योग्य पद्धतीने जुळून येऊ शकतं आहे.