होय…तुम्ही चुकलात दादा..! : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर यांच्या अनोख्या शुभेच्छा!
![Yes… You made a mistake Dada ..! : Unique wishes from Corporator Sulakshana Shilwant-Dhar to Deputy Chief Minister Ajit Pawar!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/होय…तुम्ही-चुकलात-दादा..-.jpg)
पिंपरी । अधिक दिवे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस ( दि.२२ जुलै) यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला. सामाजिक उपक्रम आणि लोकपयोगी कार्यक्रमांची अक्षरश: बरसात झाली. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील उच्चशिक्षित नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर यांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा खरंतर सत्ताधारी भाजपा नेत्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणाऱ्या आणि राष्ट्रवादीत ‘फंदफितुरी’ करणाऱ्यांना चिमटा काढणाऱ्या आहेत.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुलक्षणा शिलवंत-धर यांनी एक ‘ध्वनीफित’ प्रसिद्ध केली आहे. राज्यातील बहुदा राष्ट्रवादीसह भाजपामधील (पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीतील) अनेकांना आत्मचिंतन करायला भाग पाडणारी अशीच ही ‘ध्वनीफित’ आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला महाराष्ट्रातील विकासाचे ‘रोल मॉडेल’ म्हणून ओळखले जाते. या विकासाचे शिल्पकार खऱ्या अर्थाने अजित पवार आहेत. तब्बल २० वर्षे अजित पवार पिंपरी-चिंचवडचे ‘कारभारी’ राहीले आहेत. मात्र, २०१४ मध्ये मोदी लाट आली. या लाटेमध्ये राष्ट्रवादीच्या जहाजात बसलेल्या अनेकांनी उड्या मारल्या आणि पाठ दाखवली. अजितदादांनी ज्यांना आपले म्हणून राजकारणात मोठे केले. पद-प्रतिष्ठा दिली. त्यांनी ऐनवेळी साथ सोडली. २०१७ मध्ये महापालिकेतील सत्ता गमवावी लागली. २०१९ मध्ये भोसरी आणि चिंचवड मतदार संघामध्ये उमेदवारही देता आला नाही. अपार विश्वास ठेवलेल्या लोकांनी दगाफटका केला नव्हे, विश्वासघातच केला. त्यामुळे एखादा निष्ठावंत कार्यकर्ता ज्याप्रमाणे आपल्या भावना व्यक्त करतो. त्याच भावना नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर यांनी व्यक्त केल्या आहेत. ही अस्वस्थ भावना एकट्या सुलक्षणा यांची नाही, तर राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची आहे.
परंतु, आता दिवस बदलले, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. तसे पुन्हा काहीजण अजित पवार यांच्या ‘गुड बॉक्स’ मध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ‘तेव्हा झालेली चूक पुन्हा निश्चित अजितदादा करणार नाहीत’, अशाच भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आहेत.
काय आहेत सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या भावना…?
होय तुम्ही चुकलात दादा,
सर्वांना मस्त वाटत होतं गलिच्छ घाणेरडे या शहरात राहायला
रस्ते पाणी आरोग्य शिक्षण सगळीच बोंबाबोंब पाहायला।
तुम्ही आलात आणि शहर घडवायचा शड्डू ठोकलात,
पण एक सांगते दादा… खरच तुम्ही तेव्हा चुकलात…
इथं आया-बहिणींची दिवसाढवळ्या छेड काढली जायची,
गोरगरीब नागरिकांची मुस्कटदाबी व्हायची…
अशा शहराच्या सुरक्षेसाठी तुम्ही दिवस-रात्र झटले होते.
तुमचं काम बघून दादा डोळ्यांचे पारणे फिटले होते.
तुम्ही आयुष्यभर या शहरात प्राण ओतायचा प्रयत्न केलात. पण, एक सांगते दादा तुम्ही तेव्हा चुकलात.
इथे रस्ते नव्हते, बागा नव्हत्या… नव्हत्या कुठल्याच सोई.
शहर विचित्र वाढत होतं सोबत सगळेच गुंड, भाई.
माणसांच्या या जंगलाला तुम्ही विकासाची साथ दिली,
प्रशस्त रस्ते अन् उड्डाणपूल तुम्ही उत्कर्षाची बात दिली.
इथ जिवाचे रान करुन तुम्ही विकासाचा अंकूर पेरलात, पण एक सांगते दादा, तुम्ही तेव्हा चुकलात..!
भरपूर आले, तुम्ही मोठे केले कित्येकांनी रंग दाखवले.
शहराचे या शिल्पकार तुम्ही उज्वल भविष्याचे अंग दाखवले..!
माझ्या जनतेला मिळाव्या सर्व सुख-सोयी या एका विश्वासाने,
जगाच्या नकाशावर तुम्ही घडवलं शहर तुम्ही मोठ्या दिमाखाने…
गोरगरीब आणि दिनदुबळ्यांचे आश्रू तुम्ही पुसायला आलात,
पण एक सांगते दादा…तेव्हा तुम्ही चुकलात..!
इथल्या मातीचं आणि माणसांचे सोनं केलय तुम्ही,
समाजासाठीच तुमचं देण पवार साहेबां सारखच दिलय तुम्ही,
हे तुम्ही घडवलंय या उत्कर्षाचे विकासाचे या शहराचे भाग्यविधाते तुम्ही,
इथल्या प्रत्येकाच्या सुखाच्या हास्यात जणू विठ्ठल उभा असे तुम्ही,
कुठून एक लाट आली, स्वार्थ दिसला आणि लोकांनी देवच बदलून टाकला.
पण, एक सांगते दादा तेव्हा तुम्ही चुकलात.
खरंच सांगते दादा, कशा शुभेच्छा देवू तुम्हाला…एव्हढं सर्व दिलय तुम्ही फक्त धन्यवाद कसे म्हणू तुम्हाला…?
https://www.facebook.com/100014182420032/videos/347579050294231/