महिला दिन विशेष: स्व-सुरक्षेसाठी महिलांकडे सतर्कता महत्त्वाची!
जागतिक महिला दिन: पोलीस उपनिरीक्षक दिपाली आवारे यांचे मत

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने महिला सुरक्षेबाबत विविध सुविधा सुरू केल्या आहेत. त्यांचा अवलंब केला पाहिजे. महिला सुरक्षा हेल्पलाईन- 1091 आणि नियंत्रण कक्षाकडून मदतीसाठी 112 असा संपर्क क्रमांक आहे. त्याचा अवलंब केला पाहिजे. महिलांनी स्व-सुरक्षेसाठी सतर्कता ठेवली पाहिजे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक आणि राष्ट्रीय खेळाडू दिपाली आवारे यांनी केले.
पुनावळे येथील डी.एस.के. कुंजबन हौसिंग सोसायटीमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक दिपाली वाघ, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सैंध्रंत्री काटे- शिंदे उपस्थित होत्या.
सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. लहान मुलांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. पाहुण्यांना ‘भगवद्गिता’ भेट देवून सन्मान करण्यात आला. ‘‘महिला सुरक्षा आणि आरोग्य’’ या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सोसायटीतील रहिवाश्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हेही वाचा – माळशेज घाटातील पर्यटन होणार आणखी आकर्षक, स्कायवॉक उभारण्याची अजित पवार यांची घोषणा
महिला आरोग्याबाबत मार्गदर्शन…
डॉ. काटे-शिंदे यांनी यावेळी महिला आरोग्य आणि प्रसुतीपूर्व- प्रसुतीनंतर घ्यावयाची काळजी, तसेच मुलींच्या आरोग्याबाबत महिलांशी संवाद साधला. महिला आरोग्याच्या दृष्टीने, नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, पुरेसा व्यायाम, तणाव व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मासिक पाळी आणि प्रसूती संबंधित समस्यांवर वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे. वर्षातून एकदा तरी महिलांनी स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे गर्भाशयाचे आरोग्य, स्तनाचा कर्करोग आणि इतर महिला संबंधित समस्या लवकर ओळखता येतात. महिलांनी आपल्या आहारात फळे, भाज्या, प्रथिने आणि पुरेसे पाणी यांचा समावेश करणे आवश्यक आहे. तसेच, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे सेवन करणे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. नियमित योगासने, धावणे, चालणे किंवा इतर शारीरिक क्रिया महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरतात, अशा विविध मुद्यांवर डॉ. काटे- शिंदे यांनी मार्गदर्शन केले.