कशासाठी “कमिशन”साठी?: पिंपरी-चिंचवड महापालिकाकर संकलन विभागाची खाती हस्तांतराचा घाट?
राज्य शासन नियुक्त अधिकारी स्मिता झगडे यांचा आणखी एक प्रताप
बँक ऑफ बडोदाऐवजी आयसीसीआय बँकेत कर संकलन खाती खोलणार!
पिंपरी | प्रतिनिधी
टाटा मोटर्स कंपनीच्या कर आकारणी वरून स्टंटबाजी करणाऱ्या राज्य शासन नियुक्त अधिकारी स्मिता झगडे यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. आता “कमिशन”साठी कर संकलन विभागाची खाती हस्तांतराचा घाट घातला आहे. बँक ऑफ बडोदा ऐवजी आयसीआयसीआय बँकेत कर संकलन खाती खोलण्यात येणार आहे. या माध्यमातून मोठी उलाढाल झाली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत सुमारे साडेपाच लाख मिळकती आहेत. या मिळकतींवर महापालिका कर आकारणी करते. या कर आकारणीतून मिळणारे उत्पन्न हा पालिकेचा मोठा महसूल असून, त्यावर पालिकेची मोठी भीस्त आहे. महापालिका कर आकारणी करताना झालेले कर संकलन बँक ऑफ बडोदामध्ये जमा करते. यासाठी खाती खोलण्यात आलेली आहेत. अनेक वर्षापासून महापालिकेचे बँक ऑफ बडोदाशी चांगले संबंध आहे. मात्र, अचानक आता बँक ऑफ बडोदामधील खाती हस्तांतर करण्याचा घाट घातला आहे. बँक ऑफ बडोदा ही राष्ट्रीयीकृत बँक आहे. त्यामुळे हीच सुरक्षेची मोठी हमी आहे, असे असताना आयसीआयसीआय या खाजगी क्षेत्रातील बँकेत अचानकपणे खाती वळवण्याचा घेण्यात आलेला निर्णय कशासाठी? यावरून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
दरम्यान खाती हस्तांतर करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने अनेक सुविधा दिल्या असल्याचा दावा महापालिका करसंकलन विभागाच्या अधिकारी स्मिता झगडे यांनी तयार केलेल्या पत्रात म्हटले आहे. यामध्ये भारत बिल पेमेंट सिस्टीम, भीम ॲप याशिवाय कर संकलन विभागांतर्गत महापालिकेने मिळकत कर भरणा करण्यासाठी विविध प्रणाली विकसित केल्या आहेत. बँक ऑफ बडोदा या अद्ययावत सुविधा पुरविण्यास असमर्थ असल्यामुळे बँक ऑफ बडोदा मधील खाते आयसीआयसीआय बँकेकडे वळविण्यात यावी असे म्हटले आहे.
सुपीक कल्पना नक्की कोणाच्या डोक्यातून…
अनेक वर्षापासून महापालिकेच्या कोट्यावधींचा ठेवी तसेच कर संकलनच्या खात्यांचे व्यवहार बँक ऑफ बडोदामध्ये सुरू आहेत. अचानकपणे आधुनिक सुविधांची टुम पुढे करून अचानक पणे खाती वळवण्याची सुपीक कल्पना कोणाच्या डोक्यातून पुढे आली आणि त्यातून कोणाचे भले होणार आहे असा प्रश्न पालिका वर्तुळात विचारला जात आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी पालिका कर्मचाऱ्यांसाठी राबवली जाणारी धन्वंतरी योजना रद्द करून विमा पॉलिसी कर्मचाऱ्यांच्या माथी मारण्यात आले यावरून प्रचंड विरोध झाला होता. महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अचानकपणे पोलिसांच्या पगाराची खाते अक्सिस बँकेत वळविण्यात आली होती. यावरून त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. त्याचप्रमाणे महापालिका करसंकलन विभागाची खाती अचानकपणे आयसीआयसीआय बँकेत वळविण्याचा घाट घातल्यानंतर करसंकलन अधिकारी स्मिता झगडे यांच्या कमिशनची प्रचंड चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, होवू शकला नाही.