पाणीपट्टी वसुलीसाठी सरसकट कारवाई कशासाठी ? हाउसिंग सोसायटी फेडरेशनचा सवाल
![Why all the action for recovery of water bill? Question of Housing Society Federation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Property-Tax-pcmc.jpg)
पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई तात्काळ थांबविण्याची मागणी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मिळककर वसुलीसाठी शहरातील सदनिकाधारकांचा पाणी पुरवठा (कनेक्शन) बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. तशी नोटीस संबंधित सोसायटीधारकांना देण्यात आली आहे. दरम्यान सोसायटीमध्ये राहणाऱ्या काही सदस्यांनी पाणीपट्टी थकवली आहे म्हणून पालिका सरसकट संपूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा बंद करत असल्याचे मोशी चिखली पिंपरी-चिंचवड हाऊसिंग फेडरेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मोशी चिखली पिंपरी-चिंचवड हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मिळककर वसुलीसाठी शहरातील सदनिकाधारकांचा पाणी पुरवठा (कनेक्शन) बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. तशी नोटीस संबंधित सोसायटीधारकांना देण्यात आली आहे. मात्र, गृहनिर्माण हाउसिंग सोसायटी कायद्यानुसार, प्रशासनाला अशाप्रकारे कारवाई करता येत नाही. मार्च अखेर असल्यामुळे जास्तीत-जास्त वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याकामी प्रशासन सोसायटीधारकांवर अन्यायकारक आणि नियमबाह्यपणे दबाव निर्माण करीत आहे, ही बाब योग्य नाही.
सोसायटींमध्ये वास्तव्य करणाऱ्या मिळकतधारकांनी मिळकतकर भरला नाही, तर संबंधित सोसायटीचा पाणीपुरवठा बंद करण्याची रितसर नोटीस प्रशासनाकडून बजावण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकराज सुरू आहे. मात्र कोणताही निर्णय घेताना स्थानिक नागरिकांना नाहक त्रास होईल किंवा प्रशासनाविरोधात जनक्षोभ उफाळून येईल, अशी कृती प्रशासनाकडून अपेक्षीत नाही. मिळकतकर वसूल झालाच पाहिजे. मात्र, शहरातील नागरिकांना नाहक मन:स्ताप होईल, अशाप्रकारे कारवाई करणे उचित नाही. प्रशासनाने याबाबत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. अशाप्रकारे सोसायटीधारकांना दिलेल्या नोटीसा रद्द कराव्यात. अशी मागणी करण्यात आली आहे.