सोशल मीडियावर प्रभागरचना, आरक्षण सोडतीचा बोगस आदेश व्हायरल
![Ward formation on social media, bogus order of reservation draw goes viral](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/EVM-PCMC.jpg)
पिंपरी – राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचनेचे आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावर निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागरचनेचा कार्यक्रम आणि आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर केल्याचा बोगस आदेश सोमवारी (दि.१८) व्हायरल झाला आहे.
या बोगस आदेशाची नगरसेवक, इच्छुकांसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, निवडणूक आयोगाचा कोणताही आदेश आला नसून बनावट आदेश व्हायरल होत असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकांची मुदत येत्या मार्च २०२२ ला संपत आहे. निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेचे कामकाज सुरू आहे. ते होत असताना निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागरचना, हरकती, सूचना, तसेच आरक्षण सोडत आणि आरक्षणाबाबत हरकती व सूचना याबाबतचा कार्यक्रम जाहीर झाल्याची बोगस माहिती सोशल मीडियावर पसरली आहे. यामध्ये तारखा व काही अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख होता. मात्र, हे अधिकारी विद्यमान नसल्याने ही माहिती चुकीची व बोगस असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, नगरसेवक, इच्छुकांसह राजकीय वर्तुळातील व्यक्तींनी निवडणूक विभाग व संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा सुरू केली. ही माहिती बोगस असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.