#waragainstcorona: वाय.सी.एम रुग्णालयातील हंगामी कर्मचार्यांना कायम स्वरूपी सैवेत घ्या : नगरसेवक तुषार कामठे
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या अस्थापनेवर कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या कामगारांना कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करुन घ्या, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व कोरॉनाबाधित रुग्णांचा उपचार वाय.सी.एम रुग्णालयात केला जातो. येथील अनेक रुग्ण यशस्वीपणे उपचार घेवून घरी परतले आहेत. येथील अनेक हंगामी डॉक्टर व परिचारिका जीव धोक्यात घालून व जीवाचे रान करून,मेहनत घेवून येथील कोरॉनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. सदर हंगामी कर्मचारी तूटपुंज्या पगारावर जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
पालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची जंबाबदारी म्हणून यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे जेणेकरून सद्यस्थितीत या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढेल व त्यांच्या कुटुंबियांची चिंता मिटेल.तरी आपण वरील बाबीचा विचार करून त्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे.