#Waragainstcorona: रेशनिंग दुकानांना मिळणाऱ्या धान्यात सरकारकडून मापात माप, धान्याचा दर्जाही निकृष्ट: आमदार लक्ष्मण जगताप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/7-13.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोना संकट काळात राज्य सरकार नागरिकांना धान्य व्यवस्थित मिळत असल्याचा कितीही दावा करत असले तरी प्रत्यक्ष जागेवर वस्तुस्थिती वेगळीच आहे. रेशनिंग दुकानदारांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित करण्यात येत आहेत. तसेच ५० किलोच्या धान्याच्या पोत्यात ५ ते १५ टक्के घट असल्याच्या तक्रारी रेशनिंग दुकानदार करत आहेत. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नाराजी व्यक्त करणारे पत्र पाठविले आहे. रेशनिंग दुकानदारांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याचा दर्जा तसेच वजन योग्य प्रमाणात आहे की नाही याची अन्नधान्य पुरवठा विभागाने योग्य दक्षता घेण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी या पत्रात केली आहे.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मेलद्वारे पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे, “कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे रोज कष्ट करून घरातील चूल पेटविणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कष्टकऱ्यांना तसेच इतर गरजू नागरिकांना रेशनिंग दुकानातून तीन महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्री राज्यातील नागरिकांना धान्य व्यवस्थित मिळत असल्याचा दावा करत आहेत. प्रत्यक्षात जागेवर वस्तुस्थिती वेगळीच दिसत आहे.
नागरिकांना वाटपासाठी रेशनिंग दुकानदारांना सरकारकडून वितरित करण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे येत आहे. दुकानदारांपर्यंत ५० किलोची एक पोती या स्वरुपात धान्य पोहोचत आहे. या प्रत्येक पोत्यात ५ ते १५ टक्के धान्याची घट असल्याच्या तक्रारी रेशनिंग दुकानदार करत आहेत. त्यामुळे धान्यासाठी येणाऱ्या नागरिकांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न या दुकानदारांना पडला आहे. त्यातून दुकानदारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे. निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने नागरिकांमध्येही प्रचंड प्रमाणात उदासीनता निर्माण होत आहे. तसेच नागरिकांना चांगल्या प्रतीचे धान्य अद्यापही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याच्या संकटकाळात रेशनिंग धान्याची प्रचंड प्रमाणात होणारी लूट थांबविण्यासाठी गोडाऊनमधून धान्याचे वितरण करण्यापूर्वी धान्याचा दर्जा व वजन योग्य प्रमाणात वितरित होत आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने सक्षम यंत्रणा निर्माण करावी. जेणेकरून नागरिकांना चांगल्या दर्जाचे धान्य मिळेल आणि रेशनिंग दुकानदारांचेही नुकसान होणार नाही.