पिंपळे निलख येथील मनपा शाळेस हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका डोरिस यांची भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Image-2022-02-23-at-7.56.23-PM.jpeg)
- स्मार्ट सिटी अंतर्गत म्युनिसिपल ई- क्लास रुम प्रकल्पाचे केले कौतुक
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुले – मुली क्रमांक- ५२ पिंपळे निलख येथील शाळेस आज हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका डोरिस सोमर यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान श्रीम. डोरिस यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून अनेक देशांमधील विविध प्रकारे दिल्या जाणा-या शिक्षण व्यवस्थेबाबत चर्चा केली. यावेळी, त्यांच्यासोबत पुणे येथील फ्लेम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक युगांक गोयल, प्रा.श्री शिवकुमार, गणित मित्रचे योगेश शिंदे देखील उपस्थित होते.
दरम्यान, श्रीम. डोरिस यांनी विद्यार्थी व शिक्षकांसोबत अभ्यासाविषयी संवाद साधला. मुले कशाप्रकारे आनंदाने शिकू शकतात, शाळेत शिकविल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयाकडे मुलांचे लक्ष कसे केंद्रीत करता येते. या गोष्टी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभवातून शिकविल्यास त्यांचे अध्ययन दृढ होण्यास कशी मदत होते, याबाबत त्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे सांगितले. तसेच, तंत्रज्ञानासोबतच शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण पध्दती अवलंबवावी, यावर लक्ष केंद्रीत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
सर्वप्रथम, स्मार्ट सिटी अंतर्गत म्युनिसिपल ई- क्लास रुम द्वारे मनपा शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराद्वारे विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या व्यवस्थेबददल त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अनुभवलेला हा नवीन उपक्रम आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबददल श्रीम. डोरिस सोमर यांनी आनंद व्यक्त केला. प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण हे शालेय जीवनात कशाप्रकारे गरजेचा आहे, याचे प्रात्यक्षिक देखील त्यांनी शिक्षकासमवेत सादर केले. यावेळी, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता टिळेकर, श्रीम. शबाना, प्रज्ञा सोरदे, सुरेखा कुंजीर, रेश्मा पटेल, विद्यार्थी संस्कृती पानकडे, अस्मिता घाडगे, श्रद्धा कांबळे, सुभाष सिंग, अनुष्का सोनवणे, अमर पाटोळे, नंदिनी भोसले, समर्थ कांबळे, अस्मिता सोळसकर आदी उपस्थित होते.