भोसरीत आढळले कॉलराचे दोन रूग्ण, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
![Two cholera patients found in Bhosari, undergoing treatment in intensive care unit](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Pimpri-Chinchwad-2-780x470.jpg)
पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात जलजन्य आजार असलेल्या कॉलराचे दोन रूग्ण आढळले आहेत. या दोघांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, तिघांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
भोसरी येथील धावडे वस्तीमध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या जलवाहिनीमधून एका नागरिकाने नळजोड घेतले होते. मात्र, नळजोड घेताना खबरदारी न घेतल्यामुळे वाहिनीला गळती झाली. यातून दुषित पाणी पुरवठा होऊन संबंधित दोन रुग्णांना काॅलराची लागण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या दोन्ही रूग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर तिघांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा – आता थेट तुमच्या गावातून एसटी बस पंढरपूरला जाणार; मात्र ही अट लागू
काॅलरा हा आजार दुषित पाण्यातून होतो. त्यानुसार धावडेवस्ती परिसरातील पाणी तपासणीसाठी घेण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाने पाणी पुरवठा विभागाला केली आहे. तसेच वैद्यकीय विभागाकडून भोसरी परिसरात सर्वेक्षणही करण्यात येत आहे. रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले. जलवाहिन्यांमध्ये मलजल गेल्यामुळे या तिघांना कॉलरा झाल्याचा संशय आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.