बनावट आधारकार्ड, जन्म व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मिळविला पासपोर्ट!
चिंचवडमध्ये दोन बांगलादेशी जेरबंद : हिंजवडीत बांधकाम साईटवर नऊ महिने केले काम

पिंपरी | चिंचवड औद्योगिक परिसरातील भोला हॉटेलमागे सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर काम करीत शहरात बेकायदा वास्तव्य करणार्या दोन बांगलादेशी घुसखोरांना पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी (दि. २३) दुपारी करण्यात आली. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, जन्म दाखला व शाळा सोडल्याचा दाखला मिळून आला आहे. एकाने हिंजवडी आयटी पार्कमध्ये बांधकामावर नऊ महिने काम केल्याचे समोर आले आहे. तर, एकाने पाणीपतमधून पासपोर्टही काढला आहे.
शोहग सुकुमार मजुमदार (वय २०) व सुमन गोपाळ टिकादार (३५) अशी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. पोलिस अमलदार मोहसीन शेख यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिंचवड येथे भोला हॉटेलमागे सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर काही बांगलादेशी घुसखोर ओळख लपवून वास्तव्य करत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेला मिळाली. त्यानुसार, दहशतवाद विरोधी शाखेचे पथक आणि पिंपरी पोलिसांनी कारवाई करत शोहग आणि सुमन या दोन्ही बांगलादेशींना जेरबंद केले. त्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे तसेच भारतात राहण्यासाठी लागणार्या वैध व्हिसाशिवाय हिंदुस्थान – बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकार्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला फौजदार साळूंखे तपास करीत आहेत.
हेही वाचा : हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी; दोन तरुणींचा जागीच मृत्यू
चार-पाच वर्षापासून भारतात
चार ते पाच वर्षापूर्वी शोहग मजुमदार याला आई-वडीलांसह एंजटने दोन दुचाकींवरून भारतात आणले. पश्चिम बंगाल येथील परगणा जिल्ह्यात एका नातेवाईकाकडे दीड-दोन महिने राहिल्यानंतर त्याचे आई-वडील पुन्हा बांगलादेशात निघून गेले. त्यांनी भारत – बांगलादेशची सीमा नेमकी कोठून पार केली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. शोहग याने सुमारे एक वर्षे परगणा येथील चपल विक्रीच्या दुकानात काम केले. त्यानंतर एका मित्राने पुण्यात काम आहे, असे त्याला सांगितले. त्यामुळे शोहग याने ३ फेब्रुवारी २०२४ रोजी पश्चिम बंगाल येथून बनावट आधारकार्ड तयार केले.
आधारकार्ड आल्यानंतर सुमन नावाच्या मित्राबरोबर रेल्वेने फेब्रुवारी २०२४ मध्ये तो पुण्यात आला. त्याने हिंजवडी आयटी पार्कमध्ये नऊ महिने बांधकाम साईटवर काम केले. त्यानंतर तो पुन्हा एक महिना पश्चिम बंगालमध्ये जावून राहिला. २ डिसेंबर रोजी पुरोशन नावाच्या व्यक्तीसोबत तो पुन्हा रेल्वेने पिंपरी येथे आला. त्याने पिंपरीत पॅनकार्ड किंवा कोणतेही बँक खाते काढलेले नाही. बांगलादेशातील कुटूंबियांशी त्याचे मोबाईलवरून मोठ्या प्रमाणात बोलणे झाल्याचे दिसून आले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
मोबाईलमध्ये ५९ बांगलादेशी नंबर
सुमन टिकादार हा हरियाणातील पाणीपत येथे राहत असून त्याच पत्त्यावरून त्याने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट काढल्याचे समोर आले आहे. आई-वडीलांसह तो भारतात राहत होता. कामाच्या शोधात तो पुण्यात आला होता. तेथून पिंपरी – चिंचवड परिसरात मजुरीसाठी डिसेंबर २०२४ मध्ये आला आहे. त्याच्याकडे रेडमी कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला आहे. त्या मोबाईलमध्ये ५९ बांगलादेशी मोबाईल नंबर असून त्या क्रमांकावर तो मोठ्या प्रमाणात व्हॉटसअॅपद्वारे संपर्कात असल्याचे निदर्शनास आले आहे.
दोघे बांगलादेशी भारतात नेमके कोणत्या मार्गाने आले, त्यांच्यासोबत आणखी कोणी शहरात वास्तव्यास आहेत का, याबाबत सखोल तपास केला जात आहे.
– विकास राऊत (पोलीस निरीक्षक-दहशतवाद विरोधी शाखा-पिंपरी-चिंचवड)





