संत साई शाळेच्या तीन विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
शिक्षण विश्व: शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता आठवी) अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीचा एकूण निकाल २२.०६ टक्के लागला आहे. इयत्ता पाचवीचा निकाल २३.०९ टक्के, तर इयत्ता आठवीचा निकाल १९.३० टक्के लागला आहे. एकूण निकालामधील ३१ हजार ७८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यात इयत्ता पाचवीमधील १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांचा, तर आठवीतील १५ हजार ९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून ९ लाख ४४ हजार ४६३ विद्यार्थांनी नोंदणी केली होती.
हेही वाचा – तब्बल १,७२२ विद्यार्थ्यांसाठी १,५९३ नोकऱ्या

संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल, भोसरी, पुणे येथील तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेली आहेत. इयत्ता पाचवीच्या कुमारी आर्या परशुराम गुरव हिने 228 गुण घेऊन जिल्ह्यात 347 वा नंबर मिळवला आहे. तसेच विद्यालयातील इयत्ता आठवीच्या कुमारी संस्कृती ज्योतिबा लांडगे हिने 218 गुण घेऊन जिल्हास्तरीय यादीत 259 वा नंबर मिळवला आहे. त्याबरोबर इयत्ता आठवी मधीलच कुमार विनायक नवनाथ कारंडे याने सुद्धा 218 गुण घेऊन जिल्हास्तरीय यादीत 261 व नंबर मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेत अभिमानाचे व आनंदाचे वातावरण आहे. संस्थेचे संचालक तथा मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर सर , मुख्याध्यापिका सुनीता ढवळेश्वर , डायरेक्टर पायल ढवळेश्वर, उपमुख्याध्यापक रुपाली खोल्लम तसेच मार्गदर्शक संजना सिंघ व विठ्ठल पुंडे या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.





