एक्सप्रेस मार्गावर वाहतूक कोंडी

पिंपरी : नाताळ सुट्ट्यां आणि थर्टी फर्स्टचा पार्श्वभूमीवर पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडले. पहाटेपासूनच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर साधारणतः दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहने अडकून पडली. अखेर वाहतूक आणि महामार्ग पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी जड वाहने थांबवून ठेवली. त्यानंतर वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खंडाळा बोगद्याच्या तोंडावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवत मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्व सहा लेन खुल्या करत वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न महामार्ग पोलिसांनी केल्या. मात्र, वाहनाची संख्या वाढत गेल्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा गेल्या आहेत. नाताळ सण असल्याने व पुढे जोडून वर्षअखेर व नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे या सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटक हे लोणावळा, खंडाळा, कोल्हापूर, महाबळेश्वर, पांचगणी तसेच कोकण भागामध्ये निघाले होते.
हेही वाचा – ‘संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर..’; नितीन गडकरींचं विधान
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या वाढत गेल्याने पोलिसांवर मोठा ताण निर्माण झाला होता. पहाटेपासूनच या वाहनांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पूल ते अंडा पॉईंट तसेच खालापूर टोल नाका या परिसरामध्ये वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खंडाळा महामार्ग पोलीस व बोरघाट महामार्ग पोलीस यांनी धाव घेतली. या कोंडीमध्ये अनेक वाहने गरम होऊन बंददेखील पडत असल्याने कोंडीमध्ये भर पडली.
पर्यटकांनी या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये तसेच पुढील किमान आठ ते दहा दिवस पर्यटनस्थळी जाताना वेळेचे नियोजन करून घराबाहेर पडावे. जेणेकरून वाहतूक कोंडीमध्ये अडकून आपला वेळ जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच नियमांचे पालन करावे, चुकीच्या पद्धतीने वाहने पुढे घेऊन जाऊन वाहतूक कोंडीत भर घालू नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.





