ट्रॅक्टर-दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी l प्रतिनिधी
ट्रॅक्टर अचानक डाव्या बाजूला वळाल्याने पाठीमागून जाणारी दुचाकी ट्रॅक्टरच्या हेडच्या मोठ्या चाकाला धडकली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 3 मार्च रोजी रात्री दहा वाजता शाहूनगर, एमआयडीसी भोसरी येथे घडला.
विशाल सदाशिव वाघमारे (वय 31) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी विजय सदाशिव वाघमारे (वय 27, रा. अजंठानगर, निगडी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालक जगदीश परमेश्वर घोटमल (वय 38, रा. हरसवाडी, बोडरेता, कन्नड, जि. औरंगाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. फिर्यादी यांचा भाऊ मयत विशाल वाघमारे हे त्यांच्या दुचाकीवरून कंपनीतून काम संपल्यावर घरी जात होते. ते शाहूनगर येथे आले असताना त्यांच्या समोरून जाणारा ट्रॅक्टर अचानक डाव्या बाजूला वळला. त्यामुळे ट्रॅक्टरच्या हेडच्या पाठीमागील मोठ्या चाकाला विशाल यांच्या दुचाकीची धडक बसली. या अपघातात विशाल यांच्या डोक्याला, तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.