निवडणुकीत तिकीटाच्या आशेने ‘मशाल’ घेतली; पण खासदार अमोल कोल्हेंनी तिकीट कापले!
शिवसेना ठाकरे गटाला दुसरा धक्का : माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांची ‘‘घरवापसी’’
पिंपरी-चिंचवड: विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्याने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची चर्चा रंगली आहे, त्याला कारणही तसेच आहे. चिंचवडमधील ठाकरे गटाचे नेते मोरेश्वर भोंडवे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत शिवसेनेच्या नेत्यांऐवजी अजितदादांचे फोटो झळकले आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले असता मी अजितदादांसोबतच आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून मी अजितदादांना सांगूनच शिवसेनेतून तिकिटासाठी प्रयत्न केला होता. मात्र मी राष्ट्रवादीतच आहे असे सांगत एक प्रकारे मोरेश्वर भोंडवे यांची घरवापसी झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत चिंचवडमधून तिकीट मिळेल, या अपेक्षेने शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. हातात मशाल घेतली. मात्र, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तिकीट राष्ट्रवादी पवार गटाकडे खेचून आणले. त्यामुळे आम्हाला संधी मिळाली नाही. त्यानंतर अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे आमदार शंकर जगताप यांचे काम केले, असा धक्कादायक दावा माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी केला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक अशी मोरेश्वर भोंडवे यांची ओळख आहे. भोंडवे हे रावेत परिसरातून दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. रावेत, वाल्हेकरवाडी परिसरात त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. भोंडवे हे ज्या पक्षात जातील ते पॅनल या भागातून विजयी होणार अशी परिस्थिती असल्याने त्यांच्या भूमिकेला महत्व आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तीव्र इच्छुक होते. मात्र हा मतदारसंघ महायुतीत भाजपाच्या वाट्याला गेल्याने त्यांनी वेगळी भूमिका घेतली. निवडणुकीपूर्वी मोरेश्वर भोंडवे यांनी अजितदादा गटातून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र ठाकरेंनी तिकीट नाकारलं अन् ३६० डिग्रीत भोंडवेंनी घरवापसी केली आहे.
हेही वाचा : ..तेव्हाच ‘उदय’ होणार होता; संजय राऊतांचा मोठा दावा
‘‘मी अजितदादांच्या सल्ल्यानेच मशाल हाती घेतली होती. आणि महाविकास आघाडीत राहून महायुतीच्या शंकर जगतापांना आमदार केलं आहे.’’ असा दावा ठाकरेंना जय महाराष्ट्र करीत भोंडवेंनी अजितदादांना अडचणीत आणले आहे. अजितदादांनी मला राष्ट्रवादीत सामावून घेतलंय, त्यामुळं मला पक्षप्रवेशाची गरज नाही. मी आगामी महापालिका निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढणार असल्याचं ही स्वतः भोंडवेंनी जाहीर करून टाकलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के बसत आहेत. कालच एकनाथ पवार यांनी शिवसेना सोडली. आता पाठोपाठ रावेत परिसरातील ताकदिचे नेते मोरेश्वर भोडंवे यांनीही अवघ्या तीनच महिन्यांत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत पुन्हा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आहे. दरम्यान, सत्तेच्या अपेक्षेने भाजपा आणि अजितदादांची राष्ट्रवादी सोडून महाविकास आघाडीत गेलेले आणखी काही नेते, पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.