भोसरीत अद्यावत वैद्यकीय संदर्भ ग्रंथालय उभारणार : ॲड. नितीन लांडगे
![भोसरीत अद्यावत वैद्यकीय संदर्भ ग्रंथालय उभारणार : ॲड. नितीन लांडगे](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/WhatsApp-Image-2022-01-20-at-3.06.41-PM.jpeg)
- एकशे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरी
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरीत सर्व्हे क्र. १ येथे नविन भोसरी रुग्णालय उभारण्यात आले आहे. येथे तळमजल्यावर ग्रंथालयासाठी आरक्षित असणा-या जागेत अद्यावत वैद्यकीय संदर्भ ग्रंथालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली.
बुधवारी (दि. १९ जानेवारी) महापालिका भवनात ऑनलाईन झालेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. या बैठकीत विषय पत्रिकेवरील एकूण ३० आणि ऐनवेळचे ३० अशा एकूण ६० विषयांना मंजूरी देण्यात आली. यामध्ये १०१ कोटी ४० लाख ३२ हजार ३३६ रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली. भोसरी येथील उभारण्यात येणा-या वैद्यकीय संदर्भ ग्रंथालयाचा उपयोग शहरातील ३५०० हुन जास्त डॉक्टरांना होणार आहे. या ग्रंथालयात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित संदर्भ ग्रंथ, संशोधन ग्रंथ, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द होणारी वैद्यकीय क्षेत्रातील मासिके, प्रबंध, नामवंत डॉक्टर व संशोधकांचे नवनविन ग्रंथ याठिकाणी नविन डॉक्टरांना अभ्यासता येणार आहे. सर्वच क्षेत्रात संगणकीकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात देखील रोबोट सर्जरीचे प्रमाण सर्वच सर्जरीसाठी रुग्णांना वरदान ठरत आहे. हे विकसित होणारे तंत्रज्ञान याविषयीची सखोल अद्यावत माहितीचे संदर्भ ग्रंथ देखील येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे अशीही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी दिली.
तसेच पीएमपीएमएलला संचलन तुटीपोटी १५ कोटी ५६ लाख रुपये, अग्निशमन दलासाठी तीन फायर फायटींग मोटारबाईक (दुचाकी) खरेदी करण्यासाठी ४० लाख ४४ लाख ३२ हजार रुपये ; महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा विभागातील ग्रॅव्हीटी अंतर्गत असलेल्या चिंचवड ग्रॅव्हीटी, थेरगाव ग्रॅव्हीटी व सांगवी ग्रॅव्हीटी या जलक्षेत्रासाठी परिचालन करणे व देखभाल दुरूस्ती करणे अशा महसुली स्वरूपाची विविध कामे ग्रॅव्हीटी भागात काढण्यात आलेली आहेत. याकरीता वाढीव निविदा ८ कोटी ९२ लाख रुपये आणि वाढ – घट ६ कोटी ७८ लाख रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.
तसेच प्रभाग क्र. २५ ताथवडे येथील लोंढेवस्ती क्र. १ ते २, खंबेटे कॉलनी, रघुनंदन मंगल कार्यालयामागील गल्ल्या, ताथवडे गावठाण आणि प्रभागातील इतर परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी ९४ लाख २४ लाख रुपये, प्रभाग क्र.२३ मधील भगवती पाल्म्स ते विजय ट्रेडर्स पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी ९९ लाख ८५ हजार रुपये, प्रभाग क्र.२५ वाकड येथील स्वामी विवेकानंदनगर क्र. १ ते ५ आणि शुभम, यशदा व ज्ञानदा कॉलनी, प्रभागातील इतर परिसरातील रस्त्यांचे तसेच प्रभाग क्र.२५ वाकड येथील सद्गुरु कॉलनी क्र. १ ते ३, सुदर्शननगर कॉलनी क्र. १ ते ६, प्रभागातील इतर परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्याकामी १ कोटी ९३ लाख रुपये खर्च होणार आहेत. तर प्रभाग क्र. १२ मांगीरबाबा मंदीर परिसरातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ५१ लाख ३४ हजार रुपये खर्च केले जाणार असून या खर्चासही स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली अशीही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी दिली.