घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगार जेरबंद, सोन्या-चांदीचे दागिन्यासह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त
![Three burglars arrested, Rs 22 lakh seized along with gold and silver jewelery](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Pune-Crime1.jpg)
पिंपरी चिंचवड | घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. लोणीकंद ते फुलगाव रोड वढू खूर्द फाटा या ठिकाणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहाने त्यांना ताब्यात घेतले. शुक्रवारी (दि.17) ही कारवाई करण्यात आली.सचिन उर्फ राहुल राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (वय 28), सारंग उर्फ सागर संजय टोळ (वय 25) आणि सनी महेशकुमार तनेजा (वय 31) (तिघेही रा. हडपसर, मुळगाव- पंढरपूर, सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या तीन आरोपीची नावे आहेत. इतर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन माने हा आपल्या साथीदारांसोबत लोणीकंद ते फुलगाव रोड वढू खूर्द फाटा येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कार, कोयता, चाकू, मिरची पूड, दोरी असा एकूण 3 लाख 98 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीवर घरफोडीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यातील 20 तोळे सोन्याचे दागिने, 14 किलो चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 22 लाख 09 हजार 936 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.