विश्वविक्रमी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ मध्ये यंदा शिव-शंभू यशोगाथेची झंकार!
शिवकालीन परंपरेचा थाट; मर्दानी खेळांची जल्लोषमय सादरीकरणे

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतील ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपक्रम
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
इंद्रायणी नदी स्वच्छतेचा जागर संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ या भव्य उपक्रमात यंदा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ‘शिव-शंभू यशोगाथा’ या विशेष कार्यक्रम ठरणार आहे. वारकरी परंपरा आणि पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात शिवकालीन गौरवाचा भव्य आविष्कार यावर्षी पहायला मिळणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन केले जाते. यावर्षी रविवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरातून सायक्लोथॉनची सुरुवात होणार आहे. याच वेळी शिव-शंभू गर्जनेने हा परिसर दुमदुमणार आहे. रणमर्द शिलेदारांचे संचलन, शिवकालीन मर्दानी खेळ, ढोल-ताशांचा ठेका आणि मशाल-दिवटी नृत्य अशा विविध सादरीकरणांनी शिवराज्यकालीन पराक्रमाची झलक सायकलपटू आणि नागरिकांना पहायला मिळणार आहे.
हेही वाचा – बिहारमध्ये नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; भाजपला मोठा वाटा, नितीश कुमारांचं ‘हे’ खातं काढून घेतलं

छत्रपती संभाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ ला मानाचा मुजरा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक, सायकलपटू आणि शिवप्रेमी आवर्जून सहभागी झाले. शिवगौरव आणि पर्यावरणसंवर्धन यांचा सुंदर संगम घडवत ‘शिव-शंभू यशोगाथा’ हा कार्यक्रम उपक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरला आहे.
35 हजार सायकलपटू होणार सहभागी…
अविरत श्रमदानचे डॉ. निलेश लोंढे म्हणाले, “शिव-शंभू यशोगाथा ही केवळ सादरीकरणांची मालिका नसून आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि पराक्रमाची आठवण आहे. या प्रेरणेने निसर्गसंवर्धन आणि नदी स्वच्छतेच्या कार्यात लोकांचा सहभाग अधिक मजबूत होईल. इंद्रायणी नदी ही आपली ओळख आहे आणि 35 हजार सायकलपटूंच्या माध्यमातून या संदेशाची प्रभावी जनजागृती होणार आहे.” पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र, WTE फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात 5, 15 आणि 25 किमी अशा तीन ट्रॅकवर हजारोंनी सायकलस्वारांनी सहभाग नोंदवला आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“इंद्रायणी ही आपल्या संस्कृतीची जीवनधारा आहे. तिच्या स्वच्छतेसाठी जनसामान्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ मधील ‘शिव-शंभू यशोगाथा’ हा आपल्या इतिहासाचा गर्व आणि पर्यावरणसंवर्धनाचा संदेश एकत्र घेऊन जाणारा अद्वितीय उपक्रम आहे. 35 हजारांहून अधिक सायकलपटूंचा उत्स्फूर्त सहभाग पाहून नदी संवर्धनाचा लढा निश्चितच अधिक बळकट होईल, अशी मला खात्री आहे. विशेष म्हणजे, यावर्षीची सायक्लोथॉन ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला समर्पित केली आहे. शिव-शंभूप्रेमी आणि सायकलपटूंसह तमाम पिंपरी-चिंचवडकरांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.
– महेश लांडगे, आमदार,भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.




