मावळ तालुक्यात चोरट्यांनी हॉटेल फोडले
पिंपरी | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे अज्ञात चोरट्यांनी हॉटेल फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेल फोडून टीव्ही, सिलेंडर आणि इतर असे हजारो रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. ही घटना सोमवारी (दि. 27) सकाळी उघडकीस आली.
कुणाल संजय कोंडे (वय 28 रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) यांनी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बेबडओव्हळ येथे ‘मावळ हिल्स रेस्टो अँड नॉनव्हेज’ हे हॉटेल आहे. रविवारी (दि. 26) रात्री अकरा वाजता फिर्यादी यांनी त्यांचे हॉटेल कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे शटरचे लॉक तोडून शटर उघडून आत प्रवेश केला.
हॉटेलमधील दोन हजार रुपये रोख रक्कम, 26 हजार रुपये किमतीचे एल जी कंपनीचा टीव्ही, सोनी कंपनीचे होम थिएटर, कोका कंपनीचा लाल रंगाचा फ्रीज, दोन इण्डेन कंपनीचे व्यावसायिक सिलेंडर असा एकूण 28 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहेत.