पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार
![The young man was stabbed in the forearm](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-21.jpg)
पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला रस्त्यात थांबवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 22) रात्री दीड वाजताच्या सुमारास भूमकर चौकाजवळ, वाकड येथे घडली.सद्दाम अनवरअली शेख (वय 32, रा. सम्राट चौक, वाकड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा बब्रुवान आयतनभोने (वय 25, रा. थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जोयल बाबू शेकर (वय 21, रा. काळेवाडी), सुमित संतोष इजगज (वय 19, रा. पिंपरी) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र सद्दाम सोमवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दुचाकीवरून सद्दामच्या घरी जात होते. ते भूमकर चौकाजवळ आले असता सद्दामचा मित्र जोयल याने हाक मारून फिर्यादी यांना थांबवले. त्यानंतर जोयल आणि त्यांच्या मित्रांनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने सद्दामच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर लोखंडी पट्टीने पाठीवर मारले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.