लाट ओसरण्यास सुरुवात ; दैनंदिन रुग्णसंख्या सहा हजारांपर्यंत खाली
![The waves began to recede; Daily number of patients down to six thousand](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/booster-1.jpg)
मुंबई | मुंबईत तिसरी लाट आता ओसरायला सुरुवात झाली असून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख सहा हजारापर्यंत खाली आला आहे. शहरात १ जानेवारीला पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. जवळपास तीन आठवडय़ातच उच्चांक गाठलेली ही लाट त्याच वेगाने ओसरत आहे.मुंबईत २१ डिसेंबरपासून वेगाने वाढत असलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येने जानेवारीच्या दुसऱ्याच आठवडय़ात २० हजारांच्या घरात पोहोचली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही जवळपास एक लाखांच्याही वर गेली. परंतु जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापासून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख उताराला लागल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजारापर्यंत कमी झाली आहे. परिणामी उपचाराधीन रुग्णांची संख्याही ५० हजारापर्यंत खाली आली आहे. शहरात ५० हजार उपचाराधीन रुग्ण जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात होते. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे प्रतिबंधित इमारतींच्या संख्येतही घट होत असून सध्या शहरात ५२ इमारती प्रतिबंधित आहेत, तर एकही चाळ किंवा झोपडपट्टी प्रतिबंधित नाही.
बाधितांच्या प्रमाणातही घट
* दैनंदिन रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे बाधितांचे प्रमाणही ३० टक्क्यांवर गेले होते. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये यामध्येही घट झाली असून १६ टक्क्यांपर्यत आले आहे.
* मुंबईत तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात बऱ्यापैकी ओसरलेली असेल आणि फेब्रुवारीमध्ये तर करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी होईल. परंतु या काळात मात्र राज्यात अन्य जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, असे कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.
जनुकीय चाचण्यांचे अहवाल या आठवडय़ात येण्याची शक्यता
मुंबईत डिसेंबरपासून रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढायला सुरुवात झाली. त्यावेळेस पालिकेने केलेल्या जनुकीय चाचण्यांमध्ये मुंबईत सुमारे ५५ टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे असल्याचे आढळले होते. यानंतर मुंबईत वेगाने करोनाचा प्रसार वाढला. यात ओमायक्रॉनचे प्रमाण वाढून ८० टक्क्यांपेक्षाही अधिक झाल्याचे कृती दलाने सांगितले आहे. परंतु अजूनही काही रुग्णांमध्ये डेल्टाची लक्षणेही प्रामुख्याने आढळून येत आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने झाला असला तरी डेल्टाचा प्रादुर्भावही कायम असल्याचे आढळले आहे. शहरात ओमायक्रॉन आणि डेल्टा याचा प्रभाव कितपत आहे, याची पडताळणी पालिका करीत आहे. यासाठी पालिकेने २१ डिसेंबरनंतर मृत्यू झालेले रुग्ण, रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण, अतिदक्षता विभागातील रुग्ण आणि एकाच भागामध्ये समूह पद्धतीने आढळलेले रुग्ण अशा चार वर्गवारीतील निवडक रुग्णांचे ३७५ नमुने तपासणी कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच जनुकीय चाचण्यांसाठी पाठविले आहेत. याचे अहवाल या आठवडय़ात येण्याची शक्यता आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.