भटक्या प्राण्यांची सुरक्षा वाऱ्यावर; उपाययोजना करण्याची मागणी!
![The safety of stray animals in the wind; Demand for remedy!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Image-2021-09-16-at-4.11.13-PM.jpeg)
- माजी महापौर राहुल जाधव यांनी दिले निवेदन
- महापालिका आयुक्त राजेश पाटील कार्यवाही करणार
पिंपरी | प्रतिनिधी
साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्याने एक बकरीचा पोटात असलेल्या दोन पिलांसह मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच जाधववाडी येथील राजे शिवाजीनगरमध्ये आयुष गार्डन जवळ घडली. यापूर्वीही धोकादायक रस्ते किंवा इतर कारणांमुळे भटक्या प्राण्यांनी जीव गमावल्याच्या घटना आहेत. यामुळे शहरातील भटक्या जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याबाबत योग्य त्या उपायोजना कराव्यात, अशी मागणी माजी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने परिसरात ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. परिणामी, अनेक ठिकाणी महावितरण व गॅसलाइनची देखील कामे सुरू आहेत. दोन्हीही धोकादायक असल्याने विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. परंतु, महावितरणकडून भटक्या जनावरांच्या सुरक्षेबाबत काळजी घेतली जात नसल्याने अपघात घडत आहेत. सध्या जाधववाडी येथील राजे शिवाजीनगरमध्ये रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करताना सर्व्हिस मीटरची केबल तुटली होती. पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह प्रवाहीत झाल्याने येथून जाणाऱ्या बकरीला विद्युत झटका बसला. त्यामध्ये बकरीसह तिच्या पोटात असणाऱ्या दोन करडांचा जागीच मृत्यू झाला.
शहरात इतरही ठिकाणी भटक्या जनावरांचे नाहक बळी गेल्याच्या अनेक घटना आहेत. तसेच यामुळे नागरिकांना, वाहनचालकांना आणि लहान मुलांनाही धोका संभवतो. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि महावितरणकडून होत असलेल्या कामांविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासन आणि महापालिका संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घ्यावी, विकासकामे सुरू असताना जनावरे किंवा नागरिकांच्या सुरक्षेचीही काळजी घ्यावी, धोकादायक रस्त्यांची पाहणी करून तात्काळ उपायोजना करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, कार्यवाही करणार असल्याचे म्हटले आहे.