अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू;गुंठेवारी बांधकामासाठी महापालिका प्रतिज्ञापत्र घेणार
![The process of regularization of unauthorized constructions has started; Municipal Corporation will take affidavit for Gunthewari construction](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/PCMC-building-1-e1607061321182-1.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
गुंठेवारीनुसार 31 डिसेंबर 2020 पूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठीच्या अर्जासोबत बांधकाम पूर्णत्वाचा करसंकलन विभागाचा आणि जलनि:सारण विभागाचा ड्रेनेज कनेक्शन दाखला आवश्यक आहे. या दाखल्यांऐवजी मालमत्ताधारकाचे अर्थात जागामालकाचे प्रतिज्ञापत्र आणि आर्किटेक्ट यांचा दाखला घ्यावा आणि बांधकामे नियमित करण्याबाबतच्या परिपत्रकात दुरुस्ती करावी, असा निर्णय महापालिका स्थायी समिती सभेने घेतला.
शहरात 31 डिसेंबर 2020 पूर्वी झालेली गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठीच्या कागदपत्रांमध्ये दुरुस्ती करण्याची उपसूचना मंजूर केली. गुंठेवारीचे बांधकाम करण्यासाठी मालमत्ताधारकांना कागदपत्रांसह 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश काढला आहे.
त्यानुसार, बांधकाम नियमितीकरणासाठी 21 डिसेंबर 2020 पूर्वी बांधकाम पूर्णत्वाचा करसंकलन विभागाचा आणि जलनि:सारण विभागाचा ड्रेनेज कनेक्शन दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. त्याऐवजी मिळकत धारकाचे अर्थात जागामालकाचे प्रतिज्ञापत्र आणि आर्किटेक्ट यांचा दाखला घ्यावा. बांधकामाची 2019-20 आणि 2020-21 या वर्षांची मालमत्ताकर भरणा पावती घ्यावी. मालमत्ताकर भरलेला नसल्यास करसंकलन विभागाने कर भरण्यासाठी दिलेली मागणी पावती अर्जासोबत घेण्यात यावी. यानुसार परिपत्रक काढावे, अशी उपसूचना स्थायी समितीने मंजूर केली.