राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी-चिंचवडमधील पहिला पॅनल जाहीर; प्रभाग २८ मध्ये प्रचाराचा भव्य शुभारंभ
छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून व मुजोबां महाराज मंदिरात श्रीफळ वाढवून पदयात्रेद्वारे प्रचाराला सुरुवात

पिंपरी-चिंचवड | महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहरातील सर्वात पहिला पॅनल जाहीर करत प्रचाराचा शुभारंभ दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला. प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर–रहाटणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून विधिवत प्रारंभ करण्यात आला.
या पॅनलमध्ये
१) सर्वसाधारण पुरुष – श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे,
२) सर्वसाधारण ओबीसी – सौ. मिनाक्षी अनिल काटे,
३) सर्वसाधारण महिला – सौ. शितलताई नाना काटे,
४) सर्वसाधारण महिला – सौ. सायली उमेश काटे
यांचा समावेश आहे.
हेही वाचा : महापालिका निवडणुकीतही विजयरथ कायम राहील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर प्रचार प्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री. मुजोबां महाराज यांच्या मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यानंतर पिंपळे सौदागर गावठाण येथून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. या प्रचारफेरीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. संपूर्ण परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. दरम्यान, पॅनलमधील उमेदवारांचे नागरिकांच्या वतीने विविध ठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले. या प्रचारफेरीला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ व नागरिकांना संबोधित करताना श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे म्हणाले, “शहरातील सर्व प्रभागांमध्ये ५० टक्के आरक्षणानुसार दोन महिला व दोन पुरुष उमेदवारांचा पॅनल आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर–रहाटणी येथे तीन महिला व एक पुरुष असा पॅनल आहे. हा प्रभाग महिला सशक्तीकरणाचे प्रतीक ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या पॅनलला शहरातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी करावे,” असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमामुळे प्रभागात निवडणूक वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले.





