चऱ्होली प्रभाग क्र. ३ मध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार झंझावात
मिशन-PCMC: चऱ्होली बु. परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद; महायुतीला निर्णायक आघाडीचे संकेत

पिंपरी-चिंचवड | पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत चऱ्होली बु. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराला ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईकडून उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात प्रभागातील प्रमुख रस्ते, वाड्या–वस्त्या भाजपमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असून महायुतीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे संकेत मिळत आहेत.
वडमुखवाडी येथे प्रचाराचा शुभारंभ पद्मावती देवीच्या चरणी नतमस्तक होत करण्यात आला. या वेळी माजी महापौर व उमेदवार मा. नितीनआप्पा काळजे, भाजप शहर कोषाध्यक्ष सचिनभाऊ श्रीधर तापकीर, सर्वसाधारण महिला गटातील उमेदवार सौ. अर्चनाताई राजेश सस्ते तसेच अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील उमेदवार सौ. सारिका रवींद्र गायकवाड उपस्थित होते.
प्रचार रॅलीदरम्यान सकाळच्या सत्रात वडमुखवाडी संपूर्ण गावठाण व जगताप वस्ती तर संध्याकाळच्या सत्रात चोवीसावाडी गावठाण, ताजणे मळा, काळजेवाडी गावठाण व परिसर पिंजून काढण्यात आला. प्रत्येक वाडी–वस्तीत उमेदवारांच्या आगमनावेळी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि महिला भगिनींकडून औक्षण करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
हेही वाचा : आला रे आला वासुदेव आला…’; संदीप वाघेरे अन् राष्ट्रवादीच्या पॅनेलसाठी ‘कृतज्ञतेचा’ वासुदेव रिंगणात!

मागील दहा वर्षांतील चऱ्होली बु. परिसराचा झालेला कायापालट नागरिकांच्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी महापौर नितीनआप्पा काळजे यांच्या कार्यकाळात विकासापासून वंचित असलेल्या या भागाला महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामांची संधी मिळाली. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य व नागरी सुविधांमध्ये झालेली सुधारणा नागरिकांनी समाधानाने नमूद केली.
या विकासकामांचीच परतफेड म्हणून मतदारांनी यापूर्वी आप्पांवर भरभरून विश्वास टाकल्याचे बोलले जात आहे. आता पुन्हा एकदा ‘हॅट्रिक’ करण्याची संधी असून चारही उमेदवारांसाठी ही विकासकामे मोठी जमेची बाजू ठरत असल्याचे नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले. या प्रचार फेरीत चऱ्होली मंडळातील भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, येत्या १६ तारखेला भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांवर विजयाचा गुलाल उधळला जाईल, असा ठाम विश्वास मतदार बंधू–भगिनींनी व्यक्त केला.
चऱ्होलीच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या कार्यकाळात जे काम सुरू केले, ते अधिक गतीने पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. मूलभूत सुविधा, दर्जेदार पायाभूत कामे आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारे प्रशासन हेच माझे ध्येय राहील.
– नितीन काळजे, माजी महापौर, उमेदवार, प्रभाग- 3, चऱ्होली.




