न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगावचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात
शिक्षण विश्व : “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि आरोग्य या शाळेच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये समाविष्ट असावा”

पिंपरी- चिंचवड | न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव यांचे वार्षिक स्नेहसंमेलन रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे अत्यंत दिमाखात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रियाश गायकवाड उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष विजय पवार सर, सचिव अशोक मोरे सर, खजिनदार सुरेखा पवार मॅडम, उपाध्यक्ष निलेश पलघोमल सर, सुरेश पवार सर, विलास शेलार सर, नयना माने मॅडम, विनायक पवार सर, रमेश पाटील सर, रंजीत माने सर, महादेव जमादार सर, संध्या पवार मॅडम आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेच्या मूर्तीपूजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रमुख पाहुणे डॉ. प्रियाश गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी पालकांना उपयुक्त माहिती व महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष विजय पवार सर यांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा राबवत असलेल्या उपक्रमांबाबत मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा : पुनावळे प्रीमियर लीग २०२६ : रायगड किंग्स विजयी!
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या मॅडम यांनी वार्षिक अहवाल सादर केला. चालू शैक्षणिक वर्षात विविध क्रीडा प्रकारांमध्ये तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यंदाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची संकल्पना “इतिहास भारत का” अशी होती. या माध्यमातून संपूर्ण भारताचा समृद्ध इतिहास प्रभावीपणे सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या नृत्य, नाट्य व समूह सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या सादरीकरणांचे उपस्थित पालक, प्रमुख पाहुणे, शिक्षक व मुख्याध्यापिका यांनी भरभरून कौतुक केले.
हा कार्यक्रम जिमखाना अध्यक्ष तमन्ना टीचर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सर्व शिक्षकवृंदाची उत्कृष्ट साथ लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षवर्धनी टीचर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. एकूणच शिस्तबद्ध नियोजन, विद्यार्थ्यांचे कलागुण व इतिहासाची प्रभावी मांडणी यामुळे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगावचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संस्मरणीय ठरला.
“विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे फक्त अभ्यासावर अवलंबून नसते. त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेणे, मानसिक तंदुरुस्ती राखणे आणि नैतिक मूल्यांची जोपासना करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, जेणेकरून ते भविष्यात सक्षम, तंदुरुस्त आणि समाजोपयोगी नागरिक बनतील.”
– डॉ. प्रियाश गायकवाड.




