बदनामी केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
![Suicide by strangling a young man for defamation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Suicide-1.jpg)
चौघांवर गुन्हा दाखल
पिंपरी | चार जणांनी मिळून एका तरुणाची बदनामी केली. या त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 18 जून रोजी सकाळी ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी येथे घडली.
अमित रमेश गोसावी (वय 28, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रमेश वसंत गोसावी (वय 50) यांनी मंगळवारी (दि. 22) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार संगमेश्वर गंगाधर येवते (वय 32), भोनूप्रसाद हंसराज जयस्वाल (वय 29), विश्वजीत मधुकर मेढे (वय 30), आकाश घाडगे (सर्व रा. आकुर्डी) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 306, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी यांचा मुलगा अमित गोसावी याची बदनामी केली. या बदनामीच्या त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अमितने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून त्यात आरोपींनी बदनामी केली असून या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.