विद्यार्थ्यांचा पत्रातून पालकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश
निगडीतील ज्ञानप्रबोधिनी शाळेत मुलांनी लिहिले पत्र ‘प्रिय आई–बाबा, पत्रास कारण की..

१५ जानेवारी रोजी आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही मतदान करा
पिंपरी | लोकशाहीची जाणीव आणि आदर लहान वयातच रुजावा आणि त्यातून पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे मतदान जनजागृतीचा ‘प्रिय आई–बाबा, पत्रास कारण की…’ हा आगळा–वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानिमित्त शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई-वडिलांना पत्राच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन केले.
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त ममता शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापालिकेच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, शाळेच्या पर्यवेक्षिका वैशाली गायकवाड यांच्यासह शाळेतील शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
मतदान जनजागृती पथनाट्याच्या सादरीकरणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो, तर मतदानामुळे लोकशाही वाचते. त्यामुळे रक्तदान व मतदान दोन्हींचे खूप महत्त्व आहे, असा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला. त्यानंतर फ्लॅश मॉबच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. लोकशाहीत मताधिकाराचे स्थान आणि नागरिक म्हणून असलेली जबाबदारी या सादरीकरणांतून प्रभावीपणे मांडण्यात आली.
शाळेतील विद्यार्थिनी वेदिका जाधव हिने यावेळी ‘प्रिय आई–बाबा, पत्रास कारण की…’ या उपक्रमांतर्गत स्वतःच्या आई-वडिलांना लिहिलेल्या पत्राचे वाचन करीत लोकशाहीप्रती असलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना शब्दरूपात मांडल्या. तसेच पालकांना आगामी महापालिका निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना पत्रांचे वाटप करण्यात आले. शिक्षकांना मतदानाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार पर्यवेक्षिका वैशाली गायकवाड यांनी मानले.
हेही वाचा : “मी बोलायला नाही, तर तुमचं ऐकायला आले” : आशा भोंडवे
आजची मुले उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचवण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी पालकांकडे मतदानासाठी हट्ट धरल्यास लोकशाही अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल.
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.
लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. लहान वयातच मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजल्यास तेच विद्यार्थी पुढे जबाबदार नागरिक घडतात. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचवणारा हा उपक्रम प्रभावी असून, यामुळे मतदानाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण होईल.
– ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.
असे आहे पत्र
प्रिय आई–बाबा,
पत्रास कारण की…
आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या भवितव्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस लवकरच येत आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्या दिवशी आपण आपला मौल्यवान मताधिकार बजावणार आहोत.
आई–बाबा, तुम्ही आम्हाला नेहमीच चांगले संस्कार, योग्य–अयोग्याची जाणीव आणि जबाबदार नागरिक होण्याचे महत्त्व शिकवले आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हेही तुम्हीच आम्हाला समजावले आहे. आज आम्हीच तुमच्याकडे एक छोटीशी विनंती घेऊन आलो आहोत.
ती म्हणजे आपण येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नक्की मतदान करा. कारण तुमचे एक मत आपल्या शहराचा विकास अधिक गतिमान होण्यासाठी, शहराच्या स्वच्छतेसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही मतदानासाठी बाहेर पडता, तेव्हा आम्हालाही अभिमान वाटतो की आमचे आई–बाबा जबाबदार नागरिक आहेत.
आई–बाबा, कृपया १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा आणि आम्हालाही लोकशाहीचे खरे महत्त्व कृतीतून शिकवा. तुमचा हा सहभाग आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
तुमच्या एका मतातून आमच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लागेल, याची आम्हाला खात्री आहे.
आपलाच / आपलीच
मुलगा / मुलगी




